Sangli-Ishwarpur Nagar Parishad Election Result 2025: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व, २३ जागा जिंकत विरोधी पक्षांना दिला झटका
By अविनाश कोळी | Updated: December 21, 2025 12:29 IST2025-12-21T12:28:23+5:302025-12-21T12:29:23+5:30
विरोधात एकवटलेल्या भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट तसेच काँग्रेसच्या विकास आघाडीच्या पदरात केवळ ८ जागा मिळाल्या.

Sangli-Ishwarpur Nagar Parishad Election Result 2025: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व, २३ जागा जिंकत विरोधी पक्षांना दिला झटका
सांगली : इस्लामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी वर्चस्व राखण्यात यश मिळविले. नगराध्यक्ष पदासह २३ जागा जिंकत त्यांनी सत्तांतर घडविले. विरोधात एकवटलेल्या भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट तसेच काँग्रेसच्या विकास आघाडीच्या पदरात केवळ ८ जागा मिळाल्या.
इस्लामपूर नगरपरिषदेच्या मागील निवडणुकीत जयंत पाटील यांच्याकडून दीर्घकाळ असलेली पालिकेतील सत्ता हस्तगत करीत विकास आघाडीने धक्का दिला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत विकास आघाडीला हा दबदबा राखता आला नाही. जयंत पाटील यांनी विरोधकांना धोबीपछाड दिला. ही निवडणूक जयंत पाटील यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. मतदारसंघात ठाण मांडून त्यांनी निवडणुकीची रणनीती आखली होती. त्यात त्यांना यश मिळाले.
विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्याने त्यांना मोठे यश मिळाले नाही. भाजपच्या पदरात केवळ तीन, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन तर शिंदेसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी जयंत पाटील यांना नगरपालिका निवडणुकीत धक्का देण्याची तयारी केली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. निकालानंतर ईश्वरपूर शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शहाजीबापू पाटील व भाजपचे विक्रम पाटील या दिग्गजांचा पराभवाचा धक्का बसला.