खरिपासाठी सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:40 IST2025-07-07T18:40:02+5:302025-07-07T18:40:28+5:30

जिल्हा बँकेकडून उद्दिष्टाच्या ७० टक्के वितरण

Sangli District Bank disburses loan of Rs 801 crore for Kharif | खरिपासाठी सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.. वाचा

खरिपासाठी सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.. वाचा

सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बळीराजाची पेरणीची घाई आहे. या खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जूनअखेर तब्बल ८०१ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. जिल्ह्यात कर्जवाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ७० टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८८ हजार १५४ शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

मानसिंगराव नाईक व शिवाजीराव वाघ म्हणाले, यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याने शेतात पेरणीची घाई सुरू आहे. त्यासाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना जून महिन्यापूर्वीच पीककर्ज मिळणे आवश्यक असते. मात्र, मे आणि जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पेरणीला विलंब झाला आहे. 

तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाला शून्य टक्के व्याज आकारले जाते. जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले जात आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामातील पिकांसाठी १ हजार १४८ कोटी चार लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी सध्या ८८ हजार १५४ शेतकऱ्यांना ८०१ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उर्वरित कर्ज वाटपाचे उद्दिष्ट येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.

असे आहे पीक कर्ज वाटप

पीक - शेतकरी संख्या / पीक कर्ज वाटप

  • ऊस - ५०३८४ / ४४५.९ कोटी
  • सोयाबीन - ६०२० / २.१६ कोटी
  • डाळिंब - ६०८२ / ६.१८ कोटी
  • द्राक्ष - १००३० / २१७.९७ कोटी
  • कापूस - ११६४७ / ३.९६ कोटी
  • इतर पिकांसाठी - १०१६ / ६.८२ कोटी

Web Title: Sangli District Bank disburses loan of Rs 801 crore for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.