Sangli Crime: यात्रा असल्याचे सांगून नवरी मुलीला माहेरी घेऊन गेले, अन्, परतच नाही पाठविले; तरुणाला घातला पाच लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 18:18 IST2023-02-07T18:14:43+5:302023-02-07T18:18:22+5:30
पत्नीला आणण्यासाठी गेला असता त्याच्याशी वाद घालून परत पाठविले

Sangli Crime: यात्रा असल्याचे सांगून नवरी मुलीला माहेरी घेऊन गेले, अन्, परतच नाही पाठविले; तरुणाला घातला पाच लाखांचा गंडा
विटा : खोटे लग्न लावून तीन लाख १० हजार रुपये व एक लाख ५९ हजार ९३२ रुपयांचे सोन्याचे दागिने अशी चार लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी विटा पोलिसांत कर्नाटकच्या नववधूसह पाचजणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बामणी (ता. खानापूर) येथील नवरदेव दीपक शिवाजी सावंत (वय ३९) यांनी फिर्याद दिली.
यावरून नववधू लक्ष्मी मल्लाप्पा नलवडे (रा. बैलहोंगल, कर्नाटक), अंजना दिलीप मलाईगोल (रा. हुपरी, जि. कोल्हापूर), शिवानंद मठपती स्वामी, त्याची पत्नी (दोघेही रा. गोकाक, ता. बेळगाव) व उमेश वाजंत्री या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक सावंत याच्या विवाहासाठी गावातील मजूर आणि मूळचा कर्नाटकातील असलेल्या कलगोंडा पाटील याने शिवानंद स्वामी याच्याशी संपर्क साधला. स्वामी याने कर्नाटकातील बैलहोंगल येथील लक्ष्मी नलवडे हिचा विवाह करण्याचे असल्याचे सांगितले. दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी लक्ष्मी, तिची मावशी बनून आलेली अंजना मलाईगोल, शिवानंद मठपती स्वामी, त्याची पत्नी व उमेश वाजंत्री असे पाचजण बामणी येथे रात्री ११ वाजता आले. त्यावेळी दीपक यास या सर्वांनी तीन लाख रुपये पाहिजेत तरच मुलीचे लग्न लावून देणार असे सांगितले.
दीपकने गावातील काही प्रतिष्ठित लोकांना बोलावून त्याबाबत माहिती दिली. त्याच्या बैठकीत पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार रोख ३ लाख १० हजार रुपये दिले. त्यानंतर दीपकने मुलीसाठी एक लाख ५९ हजार ९३२ रुपयांचे ३६ ग्रॅम ५०० मिली वजनाचे सोन्याचे दागिने केले. दि. १८ नोव्हेंबरला बामणी येथे सायंकाळी चार वाजता विवाह झाला. विवाह झाल्यानंतर मुलीचे नातेवाईक दि. १९ रोजी कर्नाटकात गेले.
त्यानंतर दि. २४ रोजी गावची यात्रा असल्याने आम्ही नवरी मुलीला घेऊन जातो, असे सांगून नातेवाइकांनी लक्ष्मी हिला माहेरी घेऊन गेले. मात्र, परत बामणी गावी पाठविले नाही. त्यामुळे दीपक हा पत्नीला आणण्यासाठी गेला असता त्याच्याशी वाद घालून त्याला परत पाठविले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दीपकने लक्ष्मी, अंजना, शिवानंद मठपती स्वामी व त्याची पत्नी आणि उमेश वाजंत्री यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा विटा पोलिसांत दाखल केला. सहायक पोलिस फौजदार एम. टी. मल्याळकर पुढील तपास करीत आहेत.