सांगलीत काँग्रेसला धक्क्यावर धक्के, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील 'हातात' घेणार 'कमळ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:46 IST2025-08-12T13:45:14+5:302025-08-12T13:46:58+5:30
काँग्रेसचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवकही त्यांच्यासोबत प्रवेश करणार

सांगलीत काँग्रेसला धक्क्यावर धक्के, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील 'हातात' घेणार 'कमळ'
सांगली : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. बुधवारी (दि. १३) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. काँग्रेसचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवकही त्यांच्यासोबत प्रवेश करणार आहेत.
आ. चव्हाण यांनी सोमवारी रात्री पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट देत भाजप प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशाची घोषणा केली. संजयनगर येथील भाजपचा पक्षप्रवेश सोहळा आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्नेहभोजनासाठी पृथ्वीराज पाटील यांच्या वसंत कॉलनीतील घरी आले. पाटील यांच्या प्रवेशाबाबत आग्रही भूमिका मांडणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हेही त्यांच्यासोबत आले. आमदार सुरेश खाडे, जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार, नीता केळकर, शेखर इनामदार, प्रकाश ढंग, सिद्धार्थ गाडगीळ उपस्थित होते.
पृथ्वीराज पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र वीरेंद्र पाटील, पत्नी विजया पाटील आणि कुटुंबियांनी चव्हाण यांचे स्वागत केले. प्रमुख नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्याला मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्यात आला. प्रवेशाबाबत स्पष्टता झाल्यानंतर चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
रवींद्र चव्हाण म्हणाले, पृथ्वीराज पाटील यांच्यासारखा सामाजिक क्षेत्राची जाण असलेला नेता आमच्या पक्षात येत आहे. त्यांच्या स्वप्नातील सांगलीचा विकास करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत असू. पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगलीच्या विकासाचा झेंडा घेऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माझ्यासाठी सांगली फर्स्ट असेल.
आज राजीनामा देणार
पृथ्वीराज पाटील हे मंंगळवारी (दि.१२) काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. सोबतच ते काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतील, असे सांगण्यात आले.
कार्यकर्त्यांचाही सन्मान करणार : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपमध्ये सर्वांचा सन्मान होईल. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल तसेच पक्षातील अन्य पदे, निधी यात कुणीही नाराज होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.