Sangli Crime: मिरजेत निवृत्त एसटी अधिकाऱ्यास डिजिटल अरेस्टच्या भीतीने सव्वा कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:00 IST2025-12-29T16:00:21+5:302025-12-29T16:00:37+5:30
रक्कम न भरल्यास बँक खाती गोठवून अटकेच्या कारवाईची धमकी देण्यात आली

Sangli Crime: मिरजेत निवृत्त एसटी अधिकाऱ्यास डिजिटल अरेस्टच्या भीतीने सव्वा कोटींचा गंडा
मिरज (जि. सांगली) : पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत मिरजेतील एका निवृत्त एसटी अधिकाऱ्याची एक कोटी पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजेतील गुलमोहर कॉलनीतील रवींद्र कुलकर्णी यांना ३ ते १२ सप्टेंबर या कालावधीत व्हॉट्सॲप कॉल व मोबाइलवरून संपर्क साधण्यात आला. स्वतःला पोलिस अधिकारी म्हणवणाऱ्या भामट्यांनी तुमच्या नावावर सिम कार्ड घेऊन त्या आधारे बँक अकाउंट काढून त्यावर मोठ्या रकमेचे हवाला व्यवहार झाल्याचे सांगितले.
विजय मल्ल्या टोळीतील नरेश गोयल यांच्या घरातून २५० बनावट बँक पासबुक सापडले. त्यात कुलकर्णी यांचेही पासबुक सापडले असून, याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा एफआयआर दाखल केला आहे. पासबुक सापडलेल्या अनेकांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सीबीआयकडे असल्याची बतावणी करण्यात आली.
भामट्यांनी कुलकर्णी यांच्याकडून सर्व बँक खात्याचे तपशील घेतले. कुलकर्णी यांना रिझर्व्ह बँकेची कमिटी तुमच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करणार असून, त्यासाठी बँक खात्यातील ९५ टक्के रक्कम पडताळणीसाठी दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर करावी लागेल, असे सांगितले. रक्कम न भरल्यास बँक खाती गोठवून अटकेच्या कारवाईची धमकी देण्यात आली.
यामुळे कुलकर्णी यांनी त्यांच्या तीन बँक खात्यांतील सव्वा कोटी रक्कम मुंबई, कोलकाता, दिल्ली, हरियाणा या विविध राज्यांतील पाच वेगवेगळ्या बँक खात्यांवर दहा दिवसांत आरटीजीएसने वर्ग केली. ही रक्कम ७२ तासांत परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर फोन बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.