Sangli: ‘पावती करायची नाय’; दुचाकीवर ‘स्टंटबाजी’ करत ‘रिल्स’ करुन थेट पोलिसांना आव्हान दिलं. अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 18:52 IST2025-10-16T18:51:36+5:302025-10-16T18:52:09+5:30
उत्साही तरुणाने वेगळे काहीतरी करायचे आणि ‘लाईक्स’ चा पाऊस पाडायला म्हणून बेदरकारपणे बाईक चालवत ‘रिल्स’ केले

Sangli: ‘पावती करायची नाय’; दुचाकीवर ‘स्टंटबाजी’ करत ‘रिल्स’ करुन थेट पोलिसांना आव्हान दिलं. अन्...
सांगली : सध्या सोशल मीडियावर अनेक ‘रिल्स’ चा पाऊस पडत असतो. कोण कशावर ‘रिल्स’ बनवेल याचा नेम नसतो. अशाच एका उत्साही तरुणाने वेगळे काहीतरी करायचे आणि ‘लाईक्स’ चा पाऊस पाडायला म्हणून बेदरकारपणे बाईक चालवत ‘पावती करायची नाय...’ हा रिल्स व्हायरल केला.
अनेकांनी ‘लाईक्स’ चा धडाका लावला. परंतु आपली गाठ सांगलीपोलिसांशी पडल्याचे त्याला ठाऊकच नव्हते. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला नेमके पकडले. तेव्हा त्याने पोलिसदादासमोर सपशेल शरणागती पत्करली. नेटकऱ्यांना ‘बाबांनो अशी स्टंटबाजी करू नका’ अशी कळकळीची विनवणी केली.
सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या ‘रिल्स’ धुमाकूळ सुरू आहे. किमान हजारच्या पुढे तरी लाईक्स आल्याच पाहिजेत, असा अनेकांना नादच लागला आहे. अशाच एका नेटकऱ्याने दुचाकीवर नादखुळा ‘स्टंटबाजी’ करत थेट पोलिसदादांना ‘पावती करायची नाय’ असे आव्हान दिले. या रिल्सने धुमाकूळ घातल्यानंतर पोलिसदादांच्या भावना भलत्याच दुखावल्या. दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना देखील या रिल्सची माहिती मिळाली. त्यांनी सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या बेदरकार तरुणाचा शोध घेण्यास सांगितले. सायबर सेलने त्याचा इंस्टाग्राम आयडीसह सविस्तर माहिती काढली. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांना दिली.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाने तरुणास ताब्यात घेऊन वाहतूक नियंत्रण शाखेत आणले. पोलिसदादांनी मग चौकशी सुरू केली. तेव्हा तो गयावया करू लागला. ‘दादा माफी मागतो, माझे चुकले, माझी पावती फाडा’ अशी विनवणी करू लागला. परंतु पोलिस काय नमले नाहीत. ‘जशात तसे’ याप्रमाणे त्याचे ‘व्हिडिओ’ चित्रीकरण सुरू केले. त्याने नेटकऱ्यांची माफी मागत कोणीही अशी स्टंटबाजी करू नका, असे कळकळीचे आवाहनही केले. त्याच्या सपशेल शरणागतीच्या ‘रिल्स’ देखील सध्या लाईक्स मिळत आहेत.
पोलिसांची करडी नजर
सोशल मीडियावर काहीही पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणे आता सोपे राहिले नाही. कारण पोलिसांच्या ‘सोशल मॉनिटरिंग सेल’ ची सोशल मीडियावरील हालचालीवर करडी नजर असते. मिरजेत काही दिवसापूर्वी दोन गटातील वादानंतर काहींनी सोशल मीडियावर वादाला फोडणी देण्याचा प्रयत्न केला. परंतू मॉनिटरिंग सेलने अशा नेटकऱ्यांना शोधून त्यांना नोटिसा पाठवल्या. सज्जड इशारा दिला. यापुढे कोणतीही चूक झाली तर थेट पोलिस कोठडीत रवानगी होईल, असे सांगितले.