जयंत पाटील सांगतील तिथे यायला तयार, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:13 IST2025-10-01T13:13:31+5:302025-10-01T13:13:52+5:30
हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात पुन्हा टीका

जयंत पाटील सांगतील तिथे यायला तयार, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान
कवठेमहांकाळ/ ढालगाव : कोणाच्याही धमक्यांना मी घाबरणार नाही. जयंत पाटील यांनी वेळ आणि ठिकाण सांगावे, तिथे मी येण्यास तयार आहे, असे आव्हान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले. आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे हिंदू बहुजन दसरा मेळावा पार पडला. यावेळी पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. ते म्हणाले, इस्लामपूरचे ईश्वरपूर होऊ नये, अशी जयंत पाटील यांची इच्छा होती. त्यांच्या धमक्यांना मी घाबरणार नाही.
ते म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला राजकीय आरक्षण वगळून फक्त शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे. असे झाले तर मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद मिटेल. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नसून ते दाखले बनावट असतील तर आमचा त्याला विरोध आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या पोरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळाला पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे. त्यासाठी माझी भूमिका ठाम आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मी समाजाच्या बरोबर आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा विषय असेल, तेव्हा मी सरकारसोबत आहे.
मेळाव्यात प्रा. नितीन सावगावे, सरपंच रमेश कोळेकर, यू. टी. जाधव, संदीप गिड्डे, शिवानंद स्वामी हैबतपुरे, दौलत शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्रह्मानंद पडळकर, मिलिंद कोरे, सुभाष खांडेकर, काशिलिंग कोळेकर, राहुल कोळेकर, रामचंद्र पाटील, मनोज कोळेकर उपस्थित होते.
विरोधक एकवटले, पण भाजप नेते सोबत
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सर्व राज्यातील विरोधी नेते एकटवले आहेत. मात्र, भाजपचे सर्व नेते गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठाम पणे उभे आहेत.