ठार मारण्याची भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्यानंतर गर्भपाताचे औषध पाजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:25 IST2023-03-08T17:25:13+5:302023-03-08T17:25:44+5:30

जाधवच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना

Rape of minor girl with fear of death in sangli district | ठार मारण्याची भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्यानंतर गर्भपाताचे औषध पाजले

ठार मारण्याची भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्यानंतर गर्भपाताचे औषध पाजले

कडेगाव : तालुक्यातील एका गावात तलवारीने ठार मारण्याची भीती दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. अजित विजय जाधव (वय ३२, रा. तडसर, ता. कडेगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिला संशयित जाधव याने जबरदस्तीने गर्भपात करण्यासही भाग पाडले. याबाबत चिंचणी-वांगी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित अजित जाधव याने अल्पवयीन मुलीस तलवारीने जीवे ठार मारण्याची भीती घातली. त्यानंतर रस्त्याकडेला असलेल्या उसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर एकदा पीडिता ही तिची आई व भाऊ यांच्यासमवेत घरासमोर अंगणात झोपली असताना संशयित जाधवने तिचे तोंड दाबून घरामागील शेतात नेले. त्याठिकाणीही बलात्कार केला.

२ सप्टेंबर २०२२ ते २७ जानेवारी २०२३ या दरम्यान वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. याची माहिती मिळाल्यानंतर जाधवने गर्भपाताचे औषध पाण्यात मिसळून तिला पाजले. त्यानंतर पीडितेचा गर्भपात झाला. जाधव हा फरार असून पोलिसांनी त्याच्या तत्काळ मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. जाधवच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. या घटनेची कडेगाव पोलिसात नोंद आहे.

Web Title: Rape of minor girl with fear of death in sangli district