Sangli Crime: बेकायदा पिस्तुलांचा नेम कायदा आणि सुव्यवस्थेवरच!, निवडणुकांमुळे आगामी दोन-तीन महिने जोखमीचे
By संतोष भिसे | Updated: November 19, 2025 19:49 IST2025-11-19T19:48:52+5:302025-11-19T19:49:20+5:30
खेळण्यासारखी सापडताहेत हत्यारे, गुन्हेगारांसाठी गावठी कट्टा बनतोय स्टेटस सिम्बॉल

संग्रहित छाया
सांगली : जिल्ह्यात बेकायदा पिस्तुल किंवा गावठी कट्टा सापडला नाही, असा एकही महिना जात नाही. पोलिसांच्या कारवाईत सापडलेल्या पिस्तुलांचीच मोजदाद होते. न सापडलेल्या पिस्तुलांचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कदाचित याचा वापर कोठेतरी गोळीबारासाठी, कोठेतरी खुनासाठी किंवा खुनी हल्ल्यासाठी होतो. खुन्नस काढण्यासाठी थेट कमरेचे पिस्तुल काढले जाते. या बंदूकबाजीचा कायमचा बंदोबस्त का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी पोलिसांकडे दिसत नाही.
पोलिसांनीच दिलेल्या आकडेवारीनुसार २०२० पासून आजवरच्या सहा वर्षांत तब्बल १४६ बेकायदा पिस्तुले पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत त्याचे दीड शतक पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खेळण्यासारखी मिळणारी ही पिस्तुले बहुतांशवेळा परप्रांतातूनच येतात हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी पिस्तुल आणणाऱ्याला पकडले, पण ते तयार करणाऱ्या मुळापर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे आजही कधीतरी मिरजेत गांधी चौकात किंवा सांगलीत एसटी स्थानकात एखादी पिस्तुलाची कारवाई होतेच.
गुन्हेगारांच्या दृष्टीने पिस्तुल बाळगणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. कोयता, चाकू-सूरा ही हत्यारे आता जणू जुनाट झाली आहेत. ‘दहशत निर्माण करायची तर पिस्तुल हवेच’ ही मानसिकता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधून येणारे गावठी कट्टे ५० हजार ते एक-दोन लाखांपर्यंत सहज उपलब्ध होतात. सांगली पोलिसांनी या राज्यांत मूळ पुरवठादारापर्यंत पोहोचण्यासाठी काहीवेळा धडक मारलीही होती, मात्र परप्रांताच्या मर्यादेमुळे ते सापडले नाहीत. सांगलीत पिस्तुल विकणाऱ्याला बेड्या ठोकण्यावरच माधान मानावे लागले.
खरेदी करणारा जाळ्यात यावा
पिस्तुल विकणाऱ्याला पकडल्यावर ते घेणारादेखील जाळ्यात यायला हवा. मागणी होत राहिल्यास पुरवठादेखील सुरूच राहणार आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा ही दोहोंची साखळी पोलिसांनी तोडली, तरच बेकायदा पिस्तुलांना पायबंद बसेल. नाहीतर कुपवाडसारख्या घटनेत रात्री-बेरात्री गोळीबार झाल्यावरच पोलिसांना जाग येईल, अशी स्थिती आहे.
आगामी दोन-तीन महिने जोखमीचे
आगामी दोन-तीन महिने निवडणुकांचे असल्याने कायदा व सुव्यवस्थेसाठी जोखमीचे आहेत. तब्बल सात-आठ वर्षांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये जोरदार टशन आहे. प्रचारादरम्यान, मतदान आणि निकालादिवशी आणि निकालानंतरही वातावरणात तणाव असणार आहे. या काळात बेभान कार्यकर्त्यांकडून पिस्तुले उपसली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने पोलिसांना सतर्क राहावे लागणार आहे.
वर्ष - गुन्हे - आरोपी - पिस्तुल - काडतूस
२०२० - १२ - ३० - १३ - ३०
२०२१ - १८ - २४ - २३ - ३९
२०२२ -१८ - २३ - २९ - ४९
२०२३ - २१ - ३४ - ३० - ७२
२०२४ - २७ - ३८ - २९ - ५७
२०२५ - १९ - २६ - २२ - ३४