घनकचऱ्यासाठी दहा कोटींची वाहन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:32+5:302021-08-26T04:29:32+5:30

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीची मुदत ऑगस्टअखेरीस संपणार आहे. तत्पूर्वी कोट्यवधीच्या कामांचा झपाटा सदस्यांनी लावला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या ...

Purchase of vehicle worth Rs. 10 crore for solid waste | घनकचऱ्यासाठी दहा कोटींची वाहन खरेदी

घनकचऱ्यासाठी दहा कोटींची वाहन खरेदी

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीची मुदत ऑगस्टअखेरीस संपणार आहे. तत्पूर्वी कोट्यवधीच्या कामांचा झपाटा सदस्यांनी लावला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या सभेसमोर घनकचरा व्यवस्थापनासाठी तब्बल दहा कोटींच्या वाहन खरेदीचा प्रस्ताव आला आहे, यालाही मान्यता मिळेल. त्यामुळे जाता-जाता सदस्यांची ‘चांदी’ होणार आहे.

गेल्या आठवडाभरात स्थायी समितीच्या बैठका वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीने ६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिवे प्रकल्पाला मंजुरी दिली. मुदत संपण्यापूर्वी आणखी काही कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्याचा सपाटाच लावला आहे. विद्यमान सभापतीसह आठ सदस्यांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपणार आहे. तत्पूर्वीच हिशेब पूर्ण करण्याची घाईगडबड सुरू झाली आहे.

येत्या शुक्रवारी स्थायी समितीची सभा होत आहे. या सभेसमोरही दहा कोटींच्या वाहन खरेदीचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहे. त्यात ३ कोटी १८ लाखांचे सात नवीन काॅम्पॅक्टर, ५९.५८ लाखांचे सात लोडर, एक कोटी २४ लाखांचे चार सक्शन व्हॅन, एक कोटी २९ लाखाचे सात डम्पर प्लेसर, ९६ लाखांचे दोन जेटिंग मशीन, ३ कोटी रुपयांच्या ४८ रिक्षा घंटागाडी खरेदीस मंजुरी दिली जाणार आहे. याशिवाय महापालिकेच्या कोविड सेंटर कर्मचाऱ्यांना मुदतवाढ, मिरजेतील ग्रंथालय इमारती बांधकामासाठी निविदा मागविणे, पावसाळ्यात पाण्याचा निचरा, राडारोडा उचलण्यासाठी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी वार्षिक एजन्सी नियुक्तीचे विषय सभेसमोर चर्चेला आहेत.

Web Title: Purchase of vehicle worth Rs. 10 crore for solid waste