पुणे-कोल्हापूर-पुणे फास्ट डेमू पॅसेंजर नव्या रेकसह धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:29 IST2025-05-19T18:28:56+5:302025-05-19T18:29:25+5:30
साताऱ्यात बंद डेमू इंजिन लावून खेचून आणली

पुणे-कोल्हापूर-पुणे फास्ट डेमू पॅसेंजर नव्या रेकसह धावणार
सांगली : सांगली, साताऱ्यातील हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली पुणे-कोल्हापूर-पुणे ही फास्ट डेमू पॅसेंजर आता नव्या रेकसह धावणार आहे. सध्याची गाडी सतत बंद पडत असल्याने प्रवाशांनी सातत्याने आंदोलने केली होती. त्याची दखल घेत पुणे विभागाने १० नव्या रेकसह नवी पॅसेंजर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरात नवी गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
सध्याची डेमू पॅसेंजर प्रवासादरम्यान जागोजागी बंद पडत होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप होता. प्रवाशांनी तसेच प्रवासी संघटनांनी या गाडीविरुद्ध प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. अनेकदा आंदोलनेही केली होती. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने या पॅसेंजरचे सर्व १० डबे बदलून नवा रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, प्रवाशांना विनाखोळंबा धावणारी नवी डेमू गाडी मिळणार आहे.
कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर मार्गावर मध्य रेल्वेकडून डेमू गाड्या चालविल्या जातात. त्यांपैकी निळा आणि गुलाबी रंग असलेली डेमू सातत्याने बंद पडण्याच्या तक्रारी होत्या. अनेकदा ती साताऱ्यात किंवा मिरज-कोल्हापूरदरम्यान बंद पडायची.
साताऱ्यात बंद डेमू इंजिन लावून खेचून आणली
चारच दिवसांपूर्वी साताऱ्यात ती बंद पडल्याने इंजिन पाठवून पुढे कोल्हापूरपर्यंत ओढून आणावी लागली होती. या गाडीतून सातारा, सांगली, मिरजेतून दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी प्रवास करतात. गांधीनगरला कामासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. डेमू बंद पडत असल्याने या सर्वांचा खोळंबा होत होता. गेल्या दोन महिन्यांत तीनवेळा ती प्रवासादरम्यान बंद पडली होती. तत्काळ दुरुस्ती होत नसल्याने प्रवाशांना एका जागी दोन-दोन तास ताटकळावे लागत होते. ही गाडी बंद पडत असल्याने अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होत होता, याची दखल मध्य रेल्वेने घेतली.