गाभण मादी गवा अपघातात गंभीर जखमी; सिझेरियन ऑपरेशनकरुन सांगली पशुसंवर्धनच्या डॉक्टरांनी दिले जीवदान
By अशोक डोंबाळे | Updated: January 13, 2026 18:55 IST2026-01-13T18:54:32+5:302026-01-13T18:55:12+5:30
धाडसी कामगिरीबद्दल डॉक्टरांचे कौतुक

गाभण मादी गवा अपघातात गंभीर जखमी; सिझेरियन ऑपरेशनकरुन सांगली पशुसंवर्धनच्या डॉक्टरांनी दिले जीवदान
सांगली : कडगाव (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथे झालेल्या वाहन अपघातात गंभीर जखमी झालेल्या गाभण मादी गव्याला सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी वेळेत उपचार देत नवजीवन दिले. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत केलेल्या सिझेरियन ऑपरेशनमुळे गव्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले असून या धाडसी कामगिरीबद्दल डॉक्टरांचे कौतुक होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच डॉ. संतोष वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथून पशुसंवर्धन विभागाची तज्ज्ञ टीम तातडीने कडगाव येथे पोहोचली. तपासणीदरम्यान गव्याच्या पोटात अंतर्गत इजा व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. शिवाय ती गाभण असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होती. वासराची हालचाल मंदावल्याने गव्याचा जीव धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वनविभाग कोल्हापूर आणि पशुसंवर्धन विभाग वाळवा यांच्या संयुक्त प्रयत्नातून अत्यंत काळजीपूर्वक हे ऑपरेशन पार पाडण्यात आले. या धाडसी मोहिमेत डॉ. सचिन वंजारी, डॉ. संतोष वाळवेकर, डॉ. अंबादास माडकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. प्रवीण निमसे आणि मुकुंद वाटेगावकर यांनी विशेष योगदान दिले.
गव्याच्या प्रकृतीत सुधारणा
अवघड परिस्थितीत केलेल्या या यशस्वी सिझेरियननंतर मादी रानगव्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या तिच्यावर पुढील उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. संतोष वाळवेकर यांनी दिली.