Sangli: शेकडो झाडांना जीवदान देणारा पर्यावरणप्रेमी, ताकारीतील सपाटे कुटुंबाला वनरक्षक पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:06 IST2026-01-01T19:06:38+5:302026-01-01T19:06:54+5:30
सयाजी शिंदे यांच्याकडून कौतुकाची थाप

Sangli: शेकडो झाडांना जीवदान देणारा पर्यावरणप्रेमी, ताकारीतील सपाटे कुटुंबाला वनरक्षक पुरस्कार
नितीन पाटील
बोरगाव : सध्या वैयक्तिक स्वार्थासाठी आज झाडांची कत्तल करून निसर्ग धोक्यात येत असताना एका साॅ मिल मालकाने नामी पर्यावरणाचा वसा जपत वटवृक्ष पुनर्रोपणाचा मार्ग अवलंबून आजवर शेकडो झाडांना जीवदान देत त्यांना पालवी फोडण्याचे काम केले आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' या वाक्याचा अवलंब करत ताकारी (ता. वाळवा) येथील प्रकाश सपाटे कुटुंबाने वनरक्षक हा बहुमान प्राप्त केला आहे.
वाळवा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. अशा वेळी रस्त्याकडेचे महाकाय वटवृक्ष जमीनदोस्त होत होते. त्या परिसरातील अनेक लोकांच्या भावना, आठवणी, प्रसंग या वटवृक्षात सामावले होेते तसेच अनेक आठवणीही गुंतल्या होत्या. मात्र वृक्षतोड हाच अंतिम मार्ग होता. जनतेला वृक्षतोड पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. लोकांची ही लोकभावना ताकारीतील सॉ मिलचे मालक प्रकाश सपाटे कुटुंबाने ओळखली.
वटवृक्ष व झाडे वाचायला हवीत यासाठी त्यांनी पुणे-बंगळुरू-सांगली महामार्गावरील व अन्य रस्त्याकडेची झाडे मुळासकट काढून, क्रेनच्या माध्यमातून तांबवे, येलूय, ताकारी, दुधारी, मसुचीवाडी या गावांतील स्मशानभूमीत व रिकाम्या गावठाणात आजवर शेकडो झाडांचे पुनर्रोपण केले. त्या झाडांचे ग्रामस्थांनीही चांगले संगोपन केले. जमिनीत पुन्हा मुळे रोवत नव्याने श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक झाडांना पालवी फुटून नव्याने झाडे डोलू लागली आहेत.
नुकताच असा पुन्हा एकदा प्रयोग सपाटे यांनी दुधारी येथील स्मशानभूमीत केला. त्याला यश आले.
वडाच्या झाडाला जीवदान देण्याच्या अनोख्या उपक्रमात पंचायत समिती सदस्य रूपाली सपाटे, वाळवा तालुका सॉ मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सपाटे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सपाटे कुटुंब वृक्षतोड नाही करत तर वृक्षसंवर्धन व पुनर्रोपणाचे काम करत असल्याने समाजासमोर त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला आहे.
सयाजी शिंदे यांच्याकडून कौतुकाची थाप
एकीकडे वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन साॅ मिल मालक असतानाही आमच्या कुटुंबाने वृक्षतोड करण्यापेक्षा वृक्षसंवर्धन व वृक्षप्रत्यारोपणाचा मार्ग निवडला आहे. गेल्या दोन वर्षांत सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत १२१ झाडांचे पुनर्रोपण केले आहे. या कामाची पोच म्हणून अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेटून कौतुक केले आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व सांगली जिल्हा वनप्रमुख नीता कट्टी यांनी वनरक्षक म्हणून गौरविल्याचे प्रकाश सपाटे यांनी सांगितले.