Sangli Crime: भाजीपाला पिकात गांजा पिकवला, पोलिसांनी छापा मारून १३ लाखांचा माल जप्त केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:32 IST2025-06-28T13:32:03+5:302025-06-28T13:32:26+5:30

साळमळगेवाडीत कारवाई : जत पोलिसांकडून एकास अटक

Police raided and seized 130 kg of marijuana planted in vegetable crops in Salmalgewadi Sangli district | Sangli Crime: भाजीपाला पिकात गांजा पिकवला, पोलिसांनी छापा मारून १३ लाखांचा माल जप्त केला

Sangli Crime: भाजीपाला पिकात गांजा पिकवला, पोलिसांनी छापा मारून १३ लाखांचा माल जप्त केला

जत : साळमळगेवाडी (ता. जत) येथे भाजीपाला पिकात लागवड केलेला १३० किलो गांजा जत पोलिसांनी छापा मारून जप्त केला. गांजाची किंमत सुमारे १३ लाख रुपये आहे. याप्रकरणी संजय प्रभाकर गिरीबुवा (वय ४७, रा. साळमळगेवाडी) याला अटक केली आहे.

जत पोलिस ठाण्यापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या साळमळगेवाडी येथे संजय गिरीबुवा याने त्याच्या शेतात भाजीपाला पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जत पोलिसांनी पंचांना घेऊन साळमळगेवाडी गाव गाठले. तेथे तारांचे मंडप बांधलेले होते. भाजीपाला पिकात संजय गिरीबुवा हा मशागत करत होता.

पोलिसांनी तपासणी केल्यानंतर मिर्ची, घेवडा, वांगी, भेंडी या पिकांमध्ये ठिकठिकाणी गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. पोलिसांनी पिकाची तपासणी करून सहा ते आठ फूट उंचीची १८ झाडे जप्त केली. जप्त केलेला गांजा पोत्यात भरून वजन केले तेव्हा १३० किलो वजन भरले. त्याची किंमत दहा हजार रुपयांप्रमाणे १३ लाख रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले.

गिरीबुवा याला गांजाची लागवड केल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याविरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात याची चर्चा रंगली होती.

बालगावला हत्ती गवतात गांजा 

जत पोलिसांबरोबर उमदी पोलिसांनी बालगाव येथे भीमराया सिद्धराय हेगड्याळ याच्या शेतात छापा मारला. त्याने हत्ती गवतामध्ये गांजाची लागवड केलेली होती. पोलिसांनी ६६ हजार रुपयांचा गांजा पंचनामा करून जप्त केला. हेगड्याळ याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी लक्ष्मण बंडगर यांनी फिर्याद दिली आहे.

जत तालुका गांजाचे केंद्र

जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजा उत्पादन केला जात असल्याचे पोलिस कारवाईवरून दिसून आले. जत आणि उमदी पोलिसांनी दोन छाप्यांत पावणे चौदा लाख रुपयांचा गांजा जप्त केला.

Web Title: Police raided and seized 130 kg of marijuana planted in vegetable crops in Salmalgewadi Sangli district