आमदारांच्या कार्यालयासमोर कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:32 IST2020-01-08T17:30:30+5:302020-01-08T17:32:17+5:30
भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाजवळ सांगली-मिरज रस्त्यावरील आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडून होता. सोशल मीडियातून या कचऱ्याची छायाचित्रे प्रसिद्ध होताच, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला जाग आली. तीन तासानंतर तेथील कचरा उचलण्यात आला.

आमदारांच्या कार्यालयासमोर कचऱ्याचे ढीग
सांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाजवळ सांगली-मिरज रस्त्यावरील आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडून होता. सोशल मीडियातून या कचऱ्याची छायाचित्रे प्रसिद्ध होताच, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला जाग आली. तीन तासानंतर तेथील कचरा उचलण्यात आला.
स्वच्छ महाराष्ट्र सर्वेक्षणात सांगली महापालिकेचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत या अभियानात महापालिकेने चांगली प्रगती केली आहे. तरीही कचरा उठावाबाबत वारंवार तक्रारी येतच आहेत. कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेने ६० रिक्षा घंटागाड्याही खरेदी केल्या. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे, तरीही अजून काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे कार्यालय आहे. महापालिकेतही भाजपचीच सत्ता आहे. कार्यालयालगत थोड्या अंतरावर रस्त्याकडेला आठवडाभरापासून कचऱ्याचा ढीग पडला होता. आठवडाभर तो उचलला गेला नाही. अखेर नागरिकांनी या कचऱ्याची छायाचित्रे मंगळवारी सकाळी सोशल मीडियातून व्हायरल केली.
त्याची चर्चा सुरू होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली. तीन तासानंतर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मोठा कचरा उचलला; पण संपूर्ण कचरा उचलला गेला नाही. असे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. स्वच्छतेबाबत सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणावे तितके लक्ष नाही.