थंडीची चाहूल लागताच स्वेटर, जॅकेटमध्ये मनीमाऊ अन् मोतीचा रंगला स्वॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:10 IST2025-11-25T19:09:59+5:302025-11-25T19:10:35+5:30
पाळीव प्राण्यांसाठी गरम, उबदार, फॅशनेबल कपडे दाखल; उच्चभ्रूपासून मध्यमवर्गापर्यंत पेट केअरचा नवा ट्रेंड

संग्रहित छाया
प्रसाद माळी
सांगली : थंडीला सुरुवात झाली आहे. स्वेटर, जॅकेट, मफलरची खरेदीला ग्राहकांची झुंबड उडली आहे. पण, अनेकांनी आपल्या मोती व मनीमाऊसाठी सुद्धा उबदार कपड्यांची खरेदी सुरु केली आहे. थंडीत कुत्रे, मांजरांसाठीचे स्वेटर, जॅकेट, पाय मोजे घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. आपल्यासोबत अनेक प्राणी प्रेमी नागरिकांकडून पाळीव प्राण्यांची तितकीच काळजी घेत आहेत.
पेट स्टोअर्समध्ये थंडीत प्राण्यांना उबदार ठेवण्यासाठी कपडे दाखल झाली आहेत. कुत्रे, मांजरांचे संगोपन करणारे अनेक लोक त्यांच्या प्राण्यांसाठी अशी कपडे खरेदी करत आहेत. तसेच विविध फॅशनची कपड्यांची मागणी करत आहे. हौस करणारे लोक पेटसाठी स्वेटर, जॅकेटचसह बेड, कन्फर्ट (ब्लॅंकेट), आराम गादी, कॅट हाऊस, हुडी अशी खरेदी करत आहेत. हा ट्रेंड फक्त उच्चभ्रू लोकांमध्येच नव्हे तर मध्यमवर्गीय लोक सुद्धा आपल्या घरातील पाळीव प्राण्यासाठी अशा गोष्टी खरेदी करत आहेत. त्यामुळे अशा कपड्यांनाही मागणी वाढू लागली आहे.
पेटसाठीचे कपडे व दर
- स्वेटर / ३५० ते १२००
- जॅकेट / ३५० ते १२००
- मोजे / २५० ते ५००
- कन्फर्ट (ब्लॅंकेट) / १५०० ते २५००
- गादी / १००० ते ५०००
फेस्टिव्ह आउटफिट्स
- शर्ट / ७०० पासून पुढे
- बंधाना / २५०
- टाय / १००
- बो / १००
- टक्सिडो / ४५० ते ५००
- शूज / ७५० पासून पुढे
लग्नसराईत सजतात टॉमी आणि शर्ली
सध्या लग्नसराई सुद्धा सुरु आहे. ज्या घरात लग्न आहे त्या घरातील पेटसाठी कुत्रा-मांजरींसाठी जुळणारे कपडे, एकाच रंगाच्या थीमचे आउटफिट किंवा लग्नासाठी खास लेहेंगा-घागरा यांची मागणी वाढली आहे. निटेड स्वेटर, जाड फर जॅकेट्स, ब्लेजर, कोट, बो-टाय, नेहरू जॅकेट मांजरींसाठी फ्रॉक, लेहेंगा, घागरा-चोळी यांनाही मागणी आहे.
अलीकडच्या काळात हौसेखातर विविध प्रजातीची कुत्री, मांजरे पाळायची क्रेज निर्माण झाली आहे. अगदी घरचे सदस्य याप्रमाणे त्यांची बडदास्त ठेवली जाते. त्यांचे खानपान, दवाखाना, घालायचे नवनवीन कपडे हाही एक नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. पेटशॉप तसेच ऑनलाइन अनेक आकार व प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. परंतु, त्यांना कपडे घेताना व घालताना ऋतुप्रमाणे कपड्यांची निवड करावी. म्हणजे, आपल्या लाडक्या कुत्री, मांजरे यांना त्याचा त्रास होणार नाही. - अजित काशिद, प्राणी मित्र, सांगली.
यंदा थंडी सुरू झाल्याने पाळीव प्राण्यांसाठी उबदार कपड्यांची मागणी दुप्पट झाली आहे. समारंभासाठी पेट ब्लेजर, पारंपरिक कपड्यांना मागणी आहे. लोक आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे या प्राण्याची निगा व काळजी घेतात. त्यामुळे अशा विविध कपड्याच्या खरेदीत वाढ झाली आहे. - विकास होनमोरे, पेट शॉपचे मालक, सांगली