पाथरपुंज ठरले देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण, चेरापुंजीला टाकले मागे; यंदा किती मिमी झाला पाऊस.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:52 IST2025-09-04T13:51:08+5:302025-09-04T13:52:02+5:30

विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या पाथरपूंजने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला

Patharpunj in Satara district has become the place with the highest rainfall in the country, leaving Cherrapunji behind | पाथरपुंज ठरले देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण, चेरापुंजीला टाकले मागे; यंदा किती मिमी झाला पाऊस.. वाचा

पाथरपुंज ठरले देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण, चेरापुंजीला टाकले मागे; यंदा किती मिमी झाला पाऊस.. वाचा

शिराळा (जि. सांगली) : देशात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीला महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाने मागे टाकले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या पाथरपुंजने यावर्षीच्या पर्जन्यमानात चेरापुंजीवर मात केली आहे.

इतकेच नाही, तर राज्यातील अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोयना, नवजा, महाबळेश्वर आणि वलवण या ठिकाणांही मागे टाकत पाथरपुंज पावसाचे नवे ‘माहेरघर’, म्हणून उदयास येत आहे.

२०१९ पासून सातत्याने विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या पाथरपुंजने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच काळात मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. केवळ मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत प्रचंड आहे.

आजपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार :

पाथरपुंज : ६८१३ मिमी, दाजीपूर : ५९९२ मिमी, वलवण : ५९११ मिमी, जोर : ५६१२ मिमी, नवजा : ५३६० मिमी, गगनबावडा : ५२४२ मिमी, महाबळेश्वर : ५१३६ मिमी, कोयना : ४३२१ मिमी. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की पाथरपुंजने इतर सर्व ठिकाणांपेक्षा मोठी आघाडी घेतली आहे.

चेरापुंजीचे रेकॉर्ड धोक्यात?

चेरापुंजीच्या नावावर सर्वाधिक पावसाचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. एकेकाळी (ऑगस्ट १८६० ते जुलै १८६१) येथे २६,४७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, अलीकडच्या वर्षांत पाथरपुंजमध्ये सातत्याने पडणाऱ्या विक्रमी पावसाला पाहता, हवामान बदलाच्या या काळात पर्जन्यमानाचे केंद्र पश्चिमेकडे सरकत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्येही पाथरपुंजने चेरापुंजीला मागे टाकले होते. हाच कल कायम राहिल्यास, देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून लवकरच पाथरपुंजचे नाव कोरले जाण्याची शक्यता आहे.

तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील गाव 

पाथरपुंजचे भौगोलिक स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाटण तालुक्यात असले तरी हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर, चांदोली अभयारण्यात वसलेले आहे. येथील काही घरे तिन्ही जिल्ह्यांमध्ये विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर असूनही, येथे पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट वारणा धरणात जमा होते, ज्यामुळे वारणा धरण भरण्यामध्ये या गावाचा सिंहाचा वाटा आहे.

मान्सून २०२५ : पाथरपुंज व चेरापुंजी (१ जून ते ३१ ऑगस्टअखेर)
ठिकाण - पर्जन्यमान (मिमी)

  • पाथरपुंज ६८१३
  • चेरापुंजी ३९७५.१०

Web Title: Patharpunj in Satara district has become the place with the highest rainfall in the country, leaving Cherrapunji behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.