Sangli: ‘सगळ्यांना हाणलं नाय.. तर जयंत पाटील नाव नाय’चा फलक व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:31 IST2025-12-24T12:26:14+5:302025-12-24T12:31:41+5:30
ईश्वरपूरमध्ये लावलेले होर्डिंग अर्ध्या तासात उतरविले

Sangli: ‘सगळ्यांना हाणलं नाय.. तर जयंत पाटील नाव नाय’चा फलक व्हायरल
ईश्वरपूर (जि. सांगली) : संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या ईश्वरपूर येथील नगरपालिका निवडणुकीत यंदा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची (शरद पवार) सत्ता आली. मात्र, विजयाच्या उत्साहात कार्यकर्त्यांनी लावलेला एक फलक समाजमाध्यमांवर कमालीचा व्हायरल झाला. ‘सगळ्यांना हाणलं नाय, तर जयंत पाटील नाव नाय’ असे वाक्य असलेला हा फलक झळकला, मात्र व्हायरल होत असतानाच जयंत पाटील यांच्या सूचनेनंतर अर्ध्या तासात तो उतरविण्यात आला.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी एका मुलाखतीत जयंत पाटील यांनी हे वाक्य म्हटले होते. तेही व्हायरल झाले होते. मात्र, नगरपालिका निवडणुकीनंतर लावलेले त्याच आशयाचे फलक शहरात झळकले. समाज माध्यमांवर त्याची चर्चा होत असताना राज्यभर तो चर्चेचा विषय ठरला. राजारामबापू कारखाना परिसरात लावलेला एक फलक लागलीच उतरविण्यात आला.
राजकीय वर्तुळात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले जयंत पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा बालेकिल्ला खेचल्याने त्यांच्या समर्थकांनी यंदा मोठा जल्लोष केला. शहरभर विजयाचे फलक झळकले, मात्र सगळ्यांना हाणलं नाय... हा फलक मात्र चर्चेत आला.