अंत्री बुद्रुक येथे पशुखाद्यातून विषबाधा झाल्याने नऊ संकरित गाईंचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 23:31 IST2025-05-21T23:30:24+5:302025-05-21T23:31:42+5:30
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, विराज नाईक यांची घटनास्थळी भेट.

अंत्री बुद्रुक येथे पशुखाद्यातून विषबाधा झाल्याने नऊ संकरित गाईंचा मृत्यू
- विकास शहा, शिराळा
अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे पशु खाद्यातून विषबाधा झाल्याने दत्तात्रय उर्फ भावड्या उत्तम मोरे यांच्या पाच ते सहा वर्ष वयाच्या नऊ संकरित गाईंचा मृत्यू झाला आहे. अवघ्या पंधरा मिनिटात होत्याचे नव्हते झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आठ संकरित गाईंना गाभण असल्याने पशु खाद्य न घातल्याने त्याचा जीव वाचला आहे. या गाईंच्या मृत्यूमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दत्तात्रय मोरे यांनी आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान नऊ गाईंना पशुखाद्य खाण्यासाठी टाकले. आठ गाईंना पशुखाद्य द्यायचे नसल्याने टाकले नाही. पशुखाद्य खाल्यावर अवघ्या दहा मिनिटातच या गाईंचे पोट फुगू लागले व एक एक करत नऊ गाई खाली कोसळल्या.
यावेळी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविले. त्यांनी तपासणी केली त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काही मिनिटात या सर्व नऊ गाईंचा मृत्यू झाला.
या सर्व गाई ३० ते ३५लिटर दूध देत होत्या. त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, यासाठी पशुखाद्य नमुने तसेच गाईंचे शवविच्छेदन करून त्याचे काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामधे काही घातपात आहे का याचाही तपास पोलीस करीत आहेत.
यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व विराज नाईक यांनी समक्ष भेट दिली. तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सतीश कुमार जाधव, डॉ.सुनील पाटील, रवींद्र मटकरी,डॉ. एस एन खोत, डॉ. कैलास पोकळे,डॉ. दीपक पाटील यांनी तात्काळ भेट दिली.
शिवाजीराव नाईक म्हणाले, पशुखाद्य ज्या कंपनीचे आहे त्यांनी शेतकरी अडचणीतून बाहेर येणे साठी योग्य तपास करून याची शहा निशा होणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा या पद्धतीने पंचनामे करणे साठी सूचना दिल्या. सदरची घडलेली घटना ही अतिशय वाईट आहे.
या गाईंचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. सर्व नऊ गाईंचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या गाईंचे काही अवयव तसेच याचबरोबर गाईंनी खाल्लेले गवत, पशुखाद्य पुढील तपासणीसाठी पोलिसांमार्फत पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. -डॉ.सतीश जाधव, पशुसंवर्धन अधिकारी, शिराळा
दत्तात्रय मोरे अंत्री बुद्रुक यांच्या ९ गायी विष बाधा होऊन दगावल्या या या घटनेची माहिती मिळाल्या नंतर आमदार सत्यजित देशमुख यांनी मोरे कुटुंबायांची दूरध्वनीवरून विचारपूस केली. जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना घटने ची चौकशी करण्याचे आदेश दिले.