Sangli: एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणाची एनआयएकडून दखल, सूत्रधार इब्रारच्या पोलिस कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:36 IST2025-10-14T15:36:24+5:302025-10-14T15:36:45+5:30
मुंबईतील हस्तकांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना

Sangli: एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणाची एनआयएकडून दखल, सूत्रधार इब्रारच्या पोलिस कोठडीत वाढ
मिरज : कोल्हापुरात छापण्यात आलेल्या तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणाची दखल राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) घेतली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार इब्रार इनामदार यास न्यायालयाने आणखी तीन दिवस पोलिस कोठडी दिली. या टोळीने मुंबईतील हस्तकांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
कोल्हापूरात ‘सिद्धलक्ष्मी चहा कंपनी’च्या नावाखाली पोलिस हवालदार इब्रार इनामदार याने बनावट नोटांचा छापखाना सुरू केला होता. या टोळीचा हस्तक सुप्रीत देसाई हा मिरजेत गांधी चौक पोलिसांना सापडल्याने हे रॅकेट उघडकीस आले. पोलिसांनी टोळीचा सूत्रधार इब्रार इनामदार यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे.
वाचा- बनावट नोटातील आरोपींच्या नातेवाइकांचीही चौकशी, कोल्हापुरातील बडतर्फ पोलिसाचे व्यावसायिक भागीदार रडारवर
या टोळीने मुंबईत मोठ्या प्रमाणावर नोटा वितरित केल्याचे तपासात पुढे आल्याने मुंबईतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्याने मिरजेत येऊन या बनावट नोटा प्रकरणाची पोलिसांकडून माहिती घेतली. बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान व कागद याची माहिती घेण्यात आली. इब्रार इनामदार याची पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले.
बनावट नोटा प्रकरणाची व्याप्ती राज्यभर असून बनावट नोटा खपवणाऱ्या या टोळीच्या हस्तकांचा शोध घेण्यासाठी आणखी पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत इब्रार इनामदार व त्याचा सिद्धलक्ष्मी चहा कंपनीतील भागीदार नरेंद्र शिंदे यांना आणखी तीन दिवस पोलिस कोठडी दिली.
टोळीतील एजंटाच्या शोधासाठी पथके रवाना
टोळीचे आणखी काही एजंट असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विविध जिल्ह्यात पथके रवाना केली आहेत. इब्रार टोळीने यापूर्वी किती बनावट नोटा खपविण्यात आल्या, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.