Sangli: डम्परच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार, दीड वर्षापूर्वी झाला होता विवाह; पती गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:37 IST2025-06-25T17:36:06+5:302025-06-25T17:37:10+5:30

जमावाकडून डम्पर चालकास चोप

Newlywed woman killed on the spot in dumper accident in Sangli, husband seriously injured | Sangli: डम्परच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार, दीड वर्षापूर्वी झाला होता विवाह; पती गंभीर जखमी 

Sangli: डम्परच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार, दीड वर्षापूर्वी झाला होता विवाह; पती गंभीर जखमी 

सांगली : विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव डम्परने मोपेडला धडक दिल्यामुळे पतीसह नोकरीला निघालेली पूनम सुशांत जाधव (वय २५, रा.कवलापूर, ता.मिरज) ही नवविवाहिता ठार झाली, तर पती सुशांत जाधव हे गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने डम्पर चालकास चोप दिला. संजयनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन डम्पर चालक श्रीकांत नंदकुमार लमाण (रा.कुणीकोणूर, ता.जत) याला ताब्यात घेतले.

घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, पूनम आणि सुशांत यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. पूनम या विश्रामबाग येथील कल्लोळी हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या, तर सुशांत हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कार्यरत आहेत. दोघेही मोपेड (एमएच १० डीएन ५१००) वरून एकत्र कामावर येत होते. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दोघे घरातून बाहेर पडले. साडेदहाच्या सुमारास कुपवाडहून लक्ष्मी देवळाकडून विश्रामबागला उड्डाणपुल चढून येत असतानाच, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या काँक्रीट मिक्सर डम्पर (एमएच १७ बीडी ९१२२) ने जोराने धडक दिली. धडकेत पूनम खाली पडून त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने जागीच ठार झाल्या, तर सुशांत हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर पुलाजवळील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. पळून जाणाऱ्या डम्पर चालकाला अडवून त्याला चोप दिला. संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी दोघांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच पूनम यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी डम्पर चालक श्रीकांत नंदकुमार लमाण याला ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरा त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

अर्ध्यावरती डाव मोडला

पूनम आणि सुशांत यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. दोघेही नोकरी करून संसाराचा गाडा ओढत होते. दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती, परंतु एका अपघाताने पूनम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अर्ध्यावरती डाव मोडला गेला. अपघाताची माहिती कुटुंबीयांना समजताच दु:खाचा डोंगरच कोसळला.

उपचारापूर्वीच मृत्यू

डंपरने धडक दिल्यानंतर पूनम यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्या निपचित पडल्या होत्या. बाजूलाच जेवणाचा डबा अन् पाण्याची बाटलीही पडली होती. दोघांना एकाच वाहनातून खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात नेले. पूनम यांचा मृत्यू झाल्याचे सांगताना डॉक्टरांनी ‘सॉरी’ असा शब्द उच्चारताच सुशांत यांच्या डोळ्यासमोर अंधारी येऊन ते कोसळले.

Web Title: Newlywed woman killed on the spot in dumper accident in Sangli, husband seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.