"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 10:03 IST2025-08-31T09:55:23+5:302025-08-31T10:03:31+5:30
भाजप आमदार गोपीचंद पडळकांनी दिलेल्या आव्हानाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
Jayant Patil on Gopichand Padalkar: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार लक्ष्य केलं आहे. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून सांगलीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. हिम्मत असेल तर आमदाराकीचा राजीनामा द्या आणि माझ्याविरुद्ध निवडणूक लढा असं आव्हान गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांना दिलं होतं. आता जयंत पाटील यांनी पडखळकरांच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझा प्रॉब्लेम असून मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नसल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे आता सांगलीतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगलीतल्या एका कार्यक्रमात मतचोरीच्या मुद्द्यावरुन टीका केली. यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर भाष्य केलं. ज्याला गावात मतदान होत नाही, तो हजारोंच्या मताधिक्याने निवडून येतो. जे अचंबित करणारे आहे. हे फक्त मतचोरीमुळेच झालं, असं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या टीकेला पडळकर यांनी जशास तसे उत्तर दिलं. जयंतराव राजीनामा द्या आणि मैदानात उतरा मी तुमच्याविरोधात निवडणूक लढवतो असे आव्हान गोपीचंद पडळकर यांनी दिलं.
यावर आता जयंत पाटील पुन्हा पडळकरांना डिवचलं. "माझा प्रॉब्लेम काय आहे. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही? पण मुद्दा काय आहे, वोट चोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या. आता हे महिनाभर चालेल. समाजामध्ये असेही काही लोक लागतात. जे निंदा करतात. अलीकडे मी ही अशी लोक तयार करू लागलो आहे," असं जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, 'जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहेत. ते म्हणतात तसे सांगली जिल्हा, वाळवा तालुका कधी झुकत नाही, जे बरोबर आहे. पण जयंत पाटील हा झुकत नाही, थेट पालथाच पडतोय,' अशी टीका पडळकर यांनी केली होती.