Sangli ZP: राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याच्या मोबदल्यात अध्यक्षपदाची अट, पक्षनेत्यांची मिरजेत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:15 IST2026-02-13T18:14:40+5:302026-02-13T18:15:03+5:30
अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात

Sangli ZP: राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याच्या मोबदल्यात अध्यक्षपदाची अट, पक्षनेत्यांची मिरजेत बैठक
सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) दावेदारी केली आहे. सत्तास्थापनेत पाठिंबा कोणाला द्यायचा याचा निर्णय पक्षनेतृत्वावर सोपविण्यात आला आहे.
या विषयावर चर्चेसाठी गुरुवारी मिरजेत प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, अजितराव घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौडा रवी, अनिल पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्षपदाच्या दावेदारीचा प्रस्ताव पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय झाला. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे नेत्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी सर्व पक्षांनी फिल्डिंग लावली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंचे बहुमत अत्यंत काठावर असल्याने अजित पवार गटाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. या गटाचे सहा उमेदवार निवडून आले आहेत.
वाचा: सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वाळवा, मिरज अन् जतमध्येच रस्सीखेच
महायुती व आघाडीकडून अजित पवार गटाच्या पाठिंब्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत चर्चेसाठी गुरुवारी बैठक झाली. भाजपकडून सत्तेत सामील होण्याबाबत अजित पवार गटासोबत चर्चा करण्यात येत आहे. तरीही काही नेते आघाडीसोबत जाण्यास अनुकूल आहेत. बैठकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या ऑफरबाबत चर्चा करण्यात आली.
सत्तेमध्ये सामील होण्यासाठी अध्यक्षपदाची दावेदारी सांगण्यात आली. अध्यक्षपद देईल, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. तसा ठराव प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दोन दिवसांत पाठविला जाणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून पाठिंब्याबाबतचा निर्णय होईल, असे संजय पाटील आणि निशिकांत पाटील यांनी सांगितले.