Nashik among boys, Kolhapur among girls winners | मुलांमध्ये नाशिक, मुलींत कोल्हापूरला विजेतेपद--राज्य शालेय खो-खो स्पर्धा
मुलांमध्ये नाशिक, मुलींत कोल्हापूरला विजेतेपद--राज्य शालेय खो-खो स्पर्धा

ठळक मुद्देया अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरने दोन गुणांनी पुण्याचा धुव्वा उडवत विजय मिळवला.

हरिपूर : राज्यस्तरीय शालेय १९ वर्षाखालील खो-खो स्पर्धेत नाशिक व कोल्हापूर विभागाने चपळ खेळ करत सांगलीकरांची वाहवा मिळवली. अंतिम सामन्यात मुलांमध्ये नाशिकने कोल्हापूरचा, तर मुलींमध्ये कोल्हापूरने पुणे विभागाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

नाशिक विरूध्द कोल्हापूर असा मुलांचा अंतिम सामना पार पडला. नाशिकने एक गुण दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण करत कोल्हापूरला पराभूत केले. कोल्हापूर विरूध्द पुणे असा मुलींचा अंतिम सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात कोल्हापूरने दोन गुणांनी पुण्याचा धुव्वा उडवत विजय मिळवला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली हायस्कूल व विनोद भाटे ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. चंद्रशेखर साखरे व वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांच्याहस्ते झाले.
बक्षीस वितरण महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष माणिक पाटील, के्रडाईचे माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. समीर शेख यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक महावीर सौंदते होते. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी स्वागत केले. शासकीय खो-खो मार्गदर्शक प्रशांत पवार व सचिन नवले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी सिध्दी एज्युकेशन सेंटरचे सुभाष मोहिते, मुसा तांबोळी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, मानसिंग शिंदे, बाबगोंडा पाटील, निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्यम जाधव, राजेंद्र साप्ते, पी. आर. कांबळे, व्ही. बी. पाटील, एस. बी. चोपडे, एस. पी. कुंभार, आर. व्ही. एकल, जे. एन. दरूरे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल असा
मुले : प्रथम : नाशिक : (माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण, ता. सुरगाणा),

द्वितीय : कोल्हापूर : (सांगली हायस्कूल, सांगली), तृतीय : पुणे (संभाजीराजे विद्यालय, नातेगाव)
मुली : प्रथम : कोल्हापूर : (हुतात्मा किसन अहीर विद्यालय, वाळवा), द्वितीय : पुणे : (नरसिंह विद्यालय, रांजणी), तृतीय : मुंबई (एसएसटी विद्यालय, मुंबई)

वैयक्तिक बक्षिसे : मुले : उत्कृष्ट संरक्षक : जयदीप देसाई (कोल्हापूर),
उत्कृष्ट आक्रमक : वनराज जाधव (नाशिक)
उत्कृष्ट अष्टपैलू : दिलीप खांडवी (नाशिक)
वैयक्तिक बक्षिसे :
मुली : उत्कृष्ट संरक्षक : ऋतुजा भोर,
उत्कृष्ट आक्रमक : अश्विनी पारशे
उत्कृष्ट अष्टपैलू : वितीका मगदूम


Web Title: Nashik among boys, Kolhapur among girls winners
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.