माझे मंत्रिमंडळ ‘फुल्ल’, आता ‘व्हॅकन्सी’ नाही; जयंत पाटील यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:48 IST2025-12-01T13:48:14+5:302025-12-01T13:48:38+5:30
Local Body Election: सांगली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी चिंता करण्याची गरज नाही

माझे मंत्रिमंडळ ‘फुल्ल’, आता ‘व्हॅकन्सी’ नाही; जयंत पाटील यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा टोला
ईश्वरपूर : राज्यातील पालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सभा होत असतात, अशा सभेतून आपण कोणावरही टीकाटिप्पणी करत नाही; परंतु माझ्या मंत्रिमंडळात एकही व्हॅकन्सी नाही, असा टोला आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला, तसेच भाजपमध्येही कुणालाच प्रवेश दिला जाणार नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
येथील गांधी चौकात उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, नीता केळकर, जयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, महायुतीमधील सर्व घटक पक्ष हे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. जनतेच्या विकासात कुणीही अडथळा न आणता कामाला गती देण्याची गरज आहे. आता शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले जाणार आहे. शहरातील जनतेचे जीवनमान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरे बकाल होणार नाहीत, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवत आहोत. ते म्हणाले, जात, धर्म, पंथ न पाहता समाजातील सर्व घटकांच्या परिवर्तनासाठी हे सरकार काम करत आहे. भारताच्या तिरंगा ध्वजाचा जो मान ठेवतो त्याचे उथ्थान करणे हे आमचे कर्तव्य आहे.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सदाभाऊ खोत, नीता केळकर, सत्यजित देशमुख, सी. बी. पाटील, राहुल महाडिक, सागर खोत यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी स्वागत केले. केदार पाटील यांनी आभार मानले. यावेळी शेखर इनामदार, ॲड. चिमण डांगे, भगवानराव साळुंखे, विक्रम पाटील, मकरंद देशपांडे, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, निशिकांत पाटील, आनंदराव पवार, प्रा. मच्छिंद्र सकटे, संजय कोरे, जयवंत पाटील उपस्थित होते.