Sangli: दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला; जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा, तर एका अनोळखी महिलेचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:28 IST2026-03-31T13:26:22+5:302026-03-31T13:28:29+5:30

चार गुंठ्यासाठी खून

Murders at two different locations near Jat sangli | Sangli: दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला; जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा, तर एका अनोळखी महिलेचा खून

Sangli: दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला; जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा, तर एका अनोळखी महिलेचा खून

जत : जत शहराजवळ दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुहेरी खुनांच्या घटनाने तालुका हादरला आहे. उमदी रोडवर एका अज्ञात महिलेचा खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली, तर बिळूर रोडवर जमिनीच्या वादातून एक व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली. श्रीधर निंगोडा यडगोंड (४५, रा. बिळूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की, श्रीधर यडगोंड यांची बिळूर खोजनवाडी रोडला जमीन आहे, ज्यावरून तिघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या वादाचे पर्यवसान अनेकदा मारामारीत होत होते. जत पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. शिवाय, पोलिस अधीक्षकांकडे आणि महसूल विभागाकडेही तक्रार देण्यात आली होती. सोमवारी सकाळी या तक्रारीचा समझोता करण्यासाठी सर्वजण जतला आले होते; परंतु त्यांच्यात एकमत झाले नाही. 

सायंकाळी ५ वाजता बिळूरकडे परत जात असताना सर्वजण गविसिद्ध मंगल कार्यालयासमोर असलेल्या फॉरेस्टमध्ये थांबले. पुन्हा वाद उफाळून आला आणि पाच ते सहा जणांनी मिळून श्रीधर याला बेदम मारहाण केली. काहीजणांनी त्याच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या आणि अवघड जागेवर दगड घातला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले. 

गावाकडे जाणाऱ्या काही नागरिकांनी रस्त्याकडेला पडलेला मृतदेह पाहून ओळखला. त्यांनी त्यांच्या नातेवाइकांना आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घटनास्थळी नमुने आणि श्रीधरची दुचाकी (क्र. एमएच १० एटी ५८२४) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.

चार गुंठ्यासाठी खून

बिळूर येथील श्रीधर यांच्यासह तिघा भावात ६० एकर जमीन आहे; पण केवळ चार गुंठ्यातील सामाईक विहिरीच्या जमिनीवरून वाद होता. श्रीधरने वाद मिटविण्यासाठी सर्वांचे उंबरठे झिजवले. गावातील पंचांनी हा वाद मिटावा म्हणून प्रयत्न केला. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रार दाखल करून कार्यवाही केली होती; पण एकमेकांच्या हट्टामुळे वाद मिटला नाही. अखेर श्रीधरला प्राणाला मुकावे लागले.

अमृतवाडीच्या शेतात महिलेचा दगडाने ठेचून खून

जत शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नायरा पेट्रोलपंपाजवळ ३० ते ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अमृतवाडी गावच्या हद्दीत एका शेतात हा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. महिलेचा गळा दाबून आणि डोकं दगडाने ठेचून खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबतची माहिती अशी आहे की जत उमदी रस्त्यावर नायरा पेट्रोलपंपाजवळ मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत निर्जन ठिकाणी जोतिबा कोरे यांच्या शेतात एका महिलेचा मृतदेह काही शेतकऱ्यांना दिसून आला. त्यांनी जत पोलिसांना याची माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. पांढरी पॅन्ट आणि फुलपटक्या असलेल्या टॉपमधील या महिलेचा गळा दाबून आणि डोकं दगडाने ठेचून खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. 

मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याने हा खून दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. घटनास्थळी अन्नाचे पदार्थ, स्प्राइटची बाटली आणि बॅग मिळाली आहे. पोलिसांनी बॅग ताब्यात घेतली आहे आणि तपासासाठी नमुनेही घेतले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे आणि मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

Web Title : सांगली: जत तालुका दोहरे हत्याकांड से हिला; भूमि विवाद, अज्ञात महिला की हत्या

Web Summary : सांगली जिले के जत में दो हत्याओं से दहशत फैल गई। बिलूर के पास जमीन विवाद में एक व्यक्ति की हत्या कर दी गई, और उमदी रोड के पास एक अज्ञात महिला मृत पाई गई। पुलिस दोनों मामलों की जांच कर रही है।

Web Title : Sangli: Double murder rocks Jat taluka; land dispute, unknown woman killed.

Web Summary : Two murders in Jat, Sangli district, sparked panic. A man was killed over a land dispute near Bilur, and an unidentified woman was found murdered near Umdi road. Police are investigating both cases.