सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर खुनी हल्ला, प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:31 IST2026-01-28T18:31:25+5:302026-01-28T18:31:43+5:30
तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती

सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर खुनी हल्ला, प्रकृती चिंताजनक
सांगली : महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चाकू अडकल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना मंगळवारी (दि. २७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कलानगर येथे घडली.
हल्ल्यानंतर माळी यांच्या मित्रांनी टिंबर एरियातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील माळी हे कुटुंबीयांसह कलानगर येथे राहतात. महापालिकेचे ते मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून काम करतात. माळी दिवसभर कामावर होते. सायंकाळी ते मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी बायपास रस्त्यावर त्यांनी चहा घेतला नंतर ते मित्रासह कलानगर येथील घराकडे गेले.
यावेळी त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते. माळी हे दुचाकीवरून उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केले. वार इतका वर्मी होता की तो चाकू अडकून बसला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. माळी यांच्या मित्रांनी तातडीने टिंबर एरियातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना इनाम धामणी रोडवरील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
आयुक्तांसह अधिकाऱ्यांची धाव
हल्ल्याची माहिती मिळताच आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त स्मृती पाटील , उपायुक्त अश्विनी पाटील यांच्यासह उपअधीक्षक प्रणील गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, अरुण सुगावकर यांच्यासह पोलिस पथकांनी रुग्णालयात धाव घेतली होती.
तीन महिन्यांपूर्वीही हल्ला
सुनील माळी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. ही घटना ताजी असतानाच त्यांच्यावर पुन्हा खुनी हल्ला झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले होते.