खुनातील संशयित सांगली कारागृहातून पळाला, शोधासाठी पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:19 IST2025-11-13T14:19:07+5:302025-11-13T14:19:40+5:30
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खुनातील संशयित सांगली कारागृहातून पळाला, शोधासाठी पथके रवाना
सांगली: मिरजेत आठ महिन्यापूर्वी झालेल्या कुणाल बाली याच्या खुनातील मुख्य संशयित अजय डेव्हिड भोसले (रा. मिरज ) हा गुरुवारी सांगली कारागृहातून पळाला. त्यामुळे कारागृह प्रशासनाचे एकच तारांबळ उडाली. भोसलेच्या शोधासाठी तत्काळ वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली.
कुणालचा भाऊ वंश वाली याला मिरजेत निखिल कलगुटगी याच्या खुनातील संशयित सलीम पठाण याच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करताना बुधवारी पोलिसांनी पकडले आहे. त्यानंतर गुरुवारी वंशचा भाऊ कुणाल वाली याच्या खुनातील संशयित अजय भोसले हा कारागृहातून पसार झाल्याचा प्रकार घडला आहे.
सध्या कारागृहात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही काम सुरू आहे. गुरुवारी सकाळी अजय भोसले यांनी पळून जाण्याची संधी मिळताच कारागरातून बाहेर धूम ठोकली. तो पळाल्याचे समजतात तत्काळ कारागृह प्रशासन सतर्क झाले. भोसले हा बस स्थानकाच्या दिशेने पळून गेल्याचे समजतात कारागृह पोलिस त्याच्या मागावर धावले. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच ते देखील अजय भोसलेचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होते.
काही दिवसांपूर्वी एका कायद्याने धूम ठोकल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर पुन्हा एकदा कारागरातून कैदी पळाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.