वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 13:45 IST2022-06-05T13:25:35+5:302022-06-05T13:45:09+5:30
ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजापुर गुहागर-राष्ट्रीय महामार्ग वरील बिरनाळ ओढ्याजवळ घडली.

वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार एक जखमी
सांगली/जत : तालुक्यातील कोसारी येथील चौघेजण मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना दुर्देवी अपघात झाला आहे. या झालेल्या अपघातात तिघे ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजापुर गुहागर-राष्ट्रीय महामार्ग वरील बिरनाळ ओढ्याजवळ घडली.
या अपघातात अजित नेताजी भोसले ( वय २२), मोहित शिवाजी तोरवे (वय-२१), राजेंद्र भाले (वय-२२) हे तिघे ठार झाले आहे. तर संग्राम विक्रम तोरवे (वय १६) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय जत येथे उपचार सुरू आहेत. कोसारी येथे पहाटे साडे पाच वाजता तिघांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने कोसारी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोसारी येथील अजित भोसले व त्यांचे मित्र हे शनिवारी जतला गेले होते. रात्री उशिरा होऊन गावाकडे परतत होते. दरम्यान, बिरनाळ नजीक असणाऱ्या या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. एकाच मोटरसायकलवर चौघे जण प्रवास करत होते. यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला. घटनेचे गांभीर्य ओळखत मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ येथील नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले होते. मात्र, गंभीर जखम झाल्यामुळे मोहित तोरवे, राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी तीन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे.