शक्तिपीठ रद्दसाठी आमदार ठाम, शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा; सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:39 IST2025-01-25T12:39:09+5:302025-01-25T12:39:38+5:30
सांगली : जिल्ह्यातील १४ गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन ...

शक्तिपीठ रद्दसाठी आमदार ठाम, शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा; सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
सांगली : जिल्ह्यातील १४ गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनास जिल्ह्यातील काही आमदार आणि खासदारांनी पाठिंबा देऊन आम्हालाही शक्तिपीठ महामार्ग नकोच, अशी भूमिका आंदोलकांसमोर मांडली. शासनाविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडले.
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन मलाही शक्तिपीठ महामार्ग नकोच आहे, अशी भूमिका मांडली. शक्तिपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, असा पर्याय काढण्याची भूमिका मांडणार आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही बैठकीसाठी बोलवली जाणार आहे.
खासदार विशाल पाटील व तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनीही फोनवरून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग होऊ नये, यासाठी शासनाकडे शेतकऱ्यांची भूमिका मांडणार आहे, अशी त्यांनी भूमिका आंदोलकांसमोर मांडली. अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोजर फिरवून ठेकेदारांचे हित पाहिले जात आहे. पूर्वीच्याच रेखांकानुसार महामार्ग करणार राज्य सरकारचे प्रतिनिधी सांगत आहेत.
आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही. रेखांकन बदलून महामार्ग करणार अशा वल्गना हवेतच विरल्या आहेत. ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार, याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आंदोलनात प्रभाकर तोडकर, भूषण गुरव, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, घनश्याम नलवडे, रमेश एडके, उत्तम पाटील, गजानन हारुगडे, रघुनाथ पाटील, विलास थोरात, प्रशांत पाटील आदींसह शेकडो शेतकरी, महिला उपस्थित होते.
जिल्ह्यातील या गावांचा समावेश
शक्तिपीठ महामार्ग जिल्ह्यात खानापूर तालुक्यात बाणूरगड येथे प्रवेश करणार आहे. तेथून कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, मणेराजुरी, मतकुणकी, मिरज तालुक्यातील कवलापूर, बुधगाव, बिसूर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी या गावांतून महामार्ग जाणार आहे.
बारा जिल्ह्यात भूसंपादन सुरू
बारा जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांची बैठक घेऊन शक्तिपीठ महामार्गाचे कामासाठी भूसंपादन सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी न घेताच सरकारने काम सुरू केल्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकार कायदा हातात घेत आहे, असा आरोप उमेश देशमुख यांनी केला.