भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव, आमदार सुहास बाबर यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:44 IST2026-03-25T18:43:56+5:302026-03-25T18:44:24+5:30

राहुल नार्वेकर यांचे कारवाईचे निर्देश

MLA Suhas Babar has moved a breach of privilege motion against four officials including Neeta Kelkar a Director of Mahavitaran's holding company in connection with the inauguration of a power substation | भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव, आमदार सुहास बाबर यांचा संताप

भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव, आमदार सुहास बाबर यांचा संताप

विटा : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असताना कसलीही कल्पना न देता परस्पर आटपाडी तालुक्यातील तीन वीज उपकेंद्राचे उद्घाटन केल्याप्रकरणी आमदार सुहास बाबर यांनी ‘महावितरण’च्या होल्डिंग कंपनीच्या संचालिका नीता केळकर यांच्यासह महावितरणच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात मंगळवारी विधिमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव सादर केला. यावेळी ही बाब अत्यंत गंभीर असून याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या तक्रार दाखल केली. दि. १४ मार्चला खानापूर विधानसभा मतदारसंघातील आटपाडी तालुक्यात महावितरणच्या हिवतड, शेटफळे व दिघंची या तीन उपकेंद्रांचा लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला होता. सदर तिन्ही प्रकल्प हे पूर्णतः माझ्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतात. यासंदर्भात शासननिर्णयानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाचे निमंत्रण, अध्यक्षपद व नियोजन माझ्याशी सल्लामसलत करून होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मला कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच कार्यक्रमासाठी निमंत्रित न करता परस्पर दुसऱ्या मतदारसंघाच्या आमदारांना पाचारण करून त्यांच्याहस्ते उद्घाटन पार पाडले आहे.

ही बाब अत्यंत गंभीर असून लोकप्रतिनिधींच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र विधानसभा नियमावलीतील नियम २७३ अन्वये महावितरण होल्डिंग कंपनीच्या संचालिका नीता केळकर, विटा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते, आटपाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेश डावरे, करगणी शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता द्वारकेश बाबर व दिघंचीचे सहाय्यक अभियंता महेबूब हुबाले यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची कारवाई करावी, अशी मागणी करत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांवर विधिमंडळ अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनेक लोकप्रतिनिधींच्या अशा बऱ्याच तक्रारी आहेत परंतु अशा तक्रारी येणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. संबंधित हक्कभंगाबाबत माहिती सादर करावी व संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

सदस्यांच्या अधिकार रक्षणाची जबाबदारी सभागृहाची

महाराष्ट्र विधानसभा नियम २७३ नुसार या सभागृहातील सदस्यांचे अधिकार, सन्मान आणि प्रतिष्ठा यांचे रक्षण करण्याची जबाबदारी या सभागृहावरती असते. मात्र, माझ्या मतदारसंघात घडलेल्या या घटनेमुळे माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या अधिकाराचा स्पष्टपणे भंग झाल्याची प्रतिक्रिया आमदार सुहास बाबर यांनी यावेळी दिली.

महावितरण कंपनीकडून आटपाडी तालुक्यातील या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मला जाणीवपूर्वक त्या भागाचा आमदार असताना त्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले. - आमदार सुहास बाबर, विटा

Web Title : भाजपा नेता, चार अधिकारियों के खिलाफ विशेषाधिकार प्रस्ताव, विधायक सुहास बाबर नाराज।

Web Summary : विधायक सुहास बाबर ने भाजपा की नीता केलकर सहित अधिकारियों के खिलाफ बिना सूचना दिए बिजली उपकेंद्रों का उद्घाटन करने पर विशेषाधिकार प्रस्ताव दायर किया। स्पीकर ने कार्रवाई का आदेश दिया।

Web Title : Privilege motion against BJP leader, four officials for power plant inauguration.

Web Summary : MLA Suhas Babar files privilege motion against officials, including BJP's Nita Kelkar, for inaugurating power sub-centers without informing him. Speaker orders action.