Sangli Crime: तरुणाचा खून करुन बॅरेलमध्ये मृतदेह कोंबून विहिरीत टाकला, सात दिवसांपासून होता बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:49 IST2026-03-06T13:47:21+5:302026-03-06T13:49:07+5:30

दोन अल्पवयीन ताब्यात, खुनाच्या कारणाचा कसून शोध

Missing youth murdered in Sangli body thrown into barrel and thrown into well | Sangli Crime: तरुणाचा खून करुन बॅरेलमध्ये मृतदेह कोंबून विहिरीत टाकला, सात दिवसांपासून होता बेपत्ता

Sangli Crime: तरुणाचा खून करुन बॅरेलमध्ये मृतदेह कोंबून विहिरीत टाकला, सात दिवसांपासून होता बेपत्ता

सांगली : येथील इंदिरानगरमधून सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैसाळे (वय २९) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. खुनानंतर रोहितचा मृतदेह बॅरेलमध्ये टाकून त्यात दगड भरून तो विठ्ठलनगरमधील पडीक विहिरीत टाकला होता. पोलिसांनी सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला.

खूनप्रकरणी दोन अल्पवयीन युवकांना ताब्यात घेतले आहे. तर एकजण पसार आहे. पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. परंतु या खुनामागे वेगळे कारण असल्याच्या शक्यतेने तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित म्हैसाळे हा इंदिरानगर परिसरात राहत होता. विवाहित असून त्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. तो सेंट्रिंगची कामे करत होता. आई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करते. आई आजारी असल्याने बदली कामगार म्हणून तो कामावर जात होता. मागील महिन्यात दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता तो बदली कामावर गेला होता.

जिल्हा परिषदेसमोर सकाळी सव्वा सातच्या सुमारास त्याने वडिलांकडे पैसे मागितले होते. काही वेळातच तिघेजण दुचाकीवरून तेथे आले होते. रोहित आणि त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रोहित तेथून पळाला होता. त्यानंतर रोहित घराकडे परतला नव्हता. परंतु त्याचा वाद आणि पलायन हा घटनाक्रम काहींनी पाहिला होता.

रोहित बेपत्ता झाल्यानंतर सर्वत्र शोध घेऊन नातेवाइकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांना तपासात वेगळी माहिती मिळाल्यानंतर कसून तपास सुरू केला. रोहितच्या वादाची माहिती मिळाल्यानंतर इंदिरानगरमधील दोन अल्पवयीन मुलांना बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी रोहितच्या खुनाची माहिती सांगितली. त्या दिवशी रोहितला गाडीवरून विठ्ठलनगर येथील एका शाळेजवळ निर्जनस्थळी नेले. त्याच्यावर हत्यारांनी वार केले.

मृतदेह बॅरेलमध्ये टाकून त्यात दगड भरून तो पडीक विहिरीत फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी गुरुवारी सकाळी दोघा संशयितांना घेऊन विठ्ठलनगरमधील पडीक विहीर गाठली. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तो सडलेल्या अवस्थेत होता. बेपत्ता रोहितचाच हा मृतदेह असल्याची खात्री केली. त्याच्या खुनाबाबत पोलिसांनी दोघा अल्पवयीन युवकांकडे चौकशी केली. परंतु दोघांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत.

खुनानंतर घटनास्थळी अपर अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक कुमार पाटील आदींच्या पथकाने भेट दिली.

खुनाच्या कारणाचा कसून शोध

मृत रोहित म्हैसाळे याने दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांच्या खुनाच्या दिवशी शाहरूख उर्फ शेरा रफीक शेख याला बोलवून नेले होते. तेव्हा वादातून उत्तम मोहिते याचा खून केला. तर साथीदाराचा चाकू लागून शाहरूखचा देखील मृत्यू झाला. रोहितमुळे शाहरूखचा मृत्यू झाल्याच्या संशयातून त्याचा काटा काढला नाही ना? या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.

बॅरेलला झाकण लावून मृतदेह टाकला

संशयितांनी रोहितचा खून केल्यानंतर त्याचे तोंड व हात पाय बांधले. मृतदेह कापडात गुंडाळून बॅरेलमध्ये कोंबला. पाण्यात बॅरेल तरंगू नये म्हणून दगडाने भरला. त्यावर झाकून लावून बॅरेल विहिरीत फेकला होता. पडीक विहिरीजवळ कोणी जात नव्हते. पाण्यातील कॅमेरा आणि स्कुबा डायव्हिंग करणाऱ्यास बोलवून रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, महेश गव्हाणे, अमीर नदाफ, सागर जाधव आदींच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

नातेवाइकांचा आक्रोश

विठ्ठलनगर येथील पडीक विहीर असलेले घटनास्थळ शहराबाहेर टोकाला आहे. खुनाची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी गर्दी जमली होती. मृत रोहितचे नातेवाईक तेथे आले होते. बेपत्ता रोहितचा खून झाल्याचे समजताच त्यांनी आक्रोश केला.

Web Title : सांगली: युवक की हत्या, शव बैरल में, कुएं में फेंका गया।

Web Summary : सांगली के विट्ठलनगर के पास एक कुएं में एक निर्माण श्रमिक की हत्या कर दी गई और उसका शव एक बैरल में मिला। पुलिस पीड़ित से जुड़े एक पुराने अपराध के संभावित मकसद की जांच कर रही है।

Web Title : Sangli: Youth murdered, body in barrel, dumped in well.

Web Summary : A construction worker was murdered and his body was found in a barrel inside a well near Vitthalnagar, Sangli. Police are investigating a possible motive related to a past crime involving the victim.