सांगली जिल्ह्यात दुधाचे उत्पादन लाख लीटरने वाढले, मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:31 IST2025-07-07T18:31:10+5:302025-07-07T18:31:36+5:30
चारा उपलब्ध झाल्याचा परिणाम : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले, उत्पन्न घटले

सांगली जिल्ह्यात दुधाचे उत्पादन लाख लीटरने वाढले, मात्र..
सदानंद औंधे
मिरज : मे महिन्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे मुबलक ओला चारा उपलब्ध झाला आहे. चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दररोज दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दुधाचे उत्पादन वाढले आहे. पण, गायी-म्हशींच्या दूध दरात मात्र काही प्रमाणात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे.
जिल्ह्यात दररोज सरासरी १५ लाख लीटर दूध उत्पादन होते. यापैकी ५० टक्के पिशवीबंद दुधाची विक्री होते. उर्वरित दुधाची राज्यात मोठ्या शहरात निर्यातीसह दूध पावडर व बटर या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापर होतो. पावसाळ्याच्या चार महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध असल्याने १० ते १५ टक्के दूध उत्पादनात वाढ होते. हा दुधासाठी पृष्ठकाळ मानला जातो. यावर्षीही उन्हाळ्यात घटलेले दूध उत्पादन जून महिन्यात वाढल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते.
यावर्षी मार्चमध्ये एप्रिल महिन्यात १५ लाख लीटर दैनंदिन दूध उत्पादन होते. उन्हाळ्यात पाणी व चारा टंचाईमुळे मे महिन्यात १४ लाख लीटर दूध संकलन होत होते. जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात ओला चारा मुबलक उपलब्ध झाल्यामुळे दररोज १५ लाख ६३ हजार सरासरी दूध उत्पादन होत आहे. जिल्ह्यातील दैनंदिन दूध उत्पादनापैकी ६० टक्के गायीचे दूध आहे.
जिल्ह्यात नदीकाठावरील चार तालुक्यांत मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दुधाचा व्यवसाय आहे. जिल्ह्यात चितळे, थोटे आदी १२ खासगी दूध डेअरी, १७ मल्टीस्टेट दूध संघ दूध संकलन करत आहेत. खासगी डेअरींचे दररोज नऊ लाख लीटर दूध संकलन असून, त्यापैकी एकट्या चितळे डेअरीचे जिल्ह्यात दररोज आठ लाख लीटर संकलन आहे. यानंतर सहकारी दूध संघासह अन्य खासगी डेअरींचा नंबर लागत आहे.
जिल्ह्यातील दूध उत्पादन
- एप्रिल - १५ लाख २७ हजार
- मे - १४ लाख ४८ हजार
- जून - १५ लाख ६३ हजार
दूध खरेदी दर
- गाय - ३० रुपये
- म्हैस - ४९.५० रुपये
जून, जुलै महिन्यात हिरवा चारा उपलब्ध असल्याने दूध उत्पादनात वाढ होते. जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनाचा वापर उपपदार्थ निर्मिती व पुणे, मुंबई या शहरांत निर्यातीसाठी होतो. दुधाला दर चांगला असल्याने गायीच्या दुधाला लीटरला पाच रुपये अनुदानाची शासकीय योजना बंद झाली आहे. - गोपाल कारे, दुग्धविकास प्रशासन अधिकारी, शासकीय दूध डेअरी, मिरज.