Sangli: काम नसल्यामुळे गावाकडे निघाला, बिसूरजवळ रेल्वेतून पडून परप्रांतीय मजूर ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:06 IST2025-08-07T18:04:47+5:302025-08-07T18:06:49+5:30
दरवाजामध्ये बसल्यानंतर त्याचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला

संग्रहित छाया
सांगली : सांगली ते नांद्रे या रेल्वे मार्गावर बिसूर (ता. मिरज) येथील रेल्वे गेट नंबर २४ येथे रेल्वेतून पडून खेरवईदिन मुखिया प्रजापती (वय २५) हा उत्तर प्रदेशातील मजूर ठार झाला. मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. प्रजापती हा कोल्हापूर येथे राहत होता. काम नसल्यामुळे गावाकडे जात असताना तो नशेत रेल्वेतून पडून ठार झाल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली.
मंगळवारी सायंकाळी रेल्वेतून तरुण खाली पडून अपघात झाल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले. घटनास्थळी रुग्णवाहिका जात नव्हती. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार, महेश गव्हाणे, सागर जाधव, अनिल बसरगट्टी, सदाशिव बेडेकर आदींनी दूरवर रुग्णवाहिका थांबविली. घटनास्थळी जाऊन दुचाकीवरून मृतदेह प्लास्टिक कागदातून गुंडाळून रुग्णवाहिकेपर्यंत आणला. मृताचे नाव खेरवईदिन प्रजापती असल्याचे तपासात स्पष्ट झाले. तो कामासाठी कोल्हापूर येथे राहत होता. कोल्हापूरमध्ये काम मिळत नसल्यामुळे त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.
मंगळवारी दुपारी तो रेल्वेतून निघाला. प्रवास करताना त्याने दारू प्यायली होती. दरवाजामध्ये बसल्यानंतर त्याचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती चौकशीत पुढे आली. घटनास्थळी त्याच्या कपड्यामधून दारूची बाटली व खिशातून नंबरची डायरी मिळाली. त्याच्या डायरीतून संपर्क साधून नातेवाइकांना कळविण्यात आले. त्यांनी सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी केल्यानंतर ओळख पटली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सांगली ग्रामीण पोलिस तपास करीत आहेत.