ओबीसी जनमोर्चातर्फे सांगलीत २७ फेब्रुवारीस मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:14+5:302021-02-05T07:25:14+5:30

सांगली : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी जनमोर्चाने २७ फेब्रुवारीस सांगलीत महामेळावा आयोजित केला आहे. त्याद्वारे सरकारला ताकद दाखवून देऊ, ...

Meet on 27th February in Sangli on behalf of OBC Jan Morcha | ओबीसी जनमोर्चातर्फे सांगलीत २७ फेब्रुवारीस मेळावा

ओबीसी जनमोर्चातर्फे सांगलीत २७ फेब्रुवारीस मेळावा

सांगली : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी जनमोर्चाने २७ फेब्रुवारीस सांगलीत महामेळावा आयोजित केला आहे. त्याद्वारे सरकारला ताकद दाखवून देऊ, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला.

महामेळाव्याच्या तयारीसाठी सांगलीत शनिवारी ओबीसी नेत्यांची बैठक झाली. स्टेशन चौक किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर मेळावा घेण्याचे ठरले. जिल्हाभरातून लाखभर बांधव येण्याचा दावा शेंडगे यांनी केला. मुख्यमंत्र्यांसह ओबीसी मंत्री, आमदार, खासदारांनाही निमंत्रित केले जाईल. बैठकीला प्रदीप वाले, बाळासाहेब गुरव, सुनील गुरव, हरीदास लेंगरे, शशिकांत गायकवाड, कुंडलिक दुधाळ, अरुण खरमाटे, लक्ष्मण हाक्के, आदी उपस्थित होते.

शेंडगे म्हणाले, मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध नाही. आरक्षणाच्या खेळखंडोब्यामुळे ओबीसी भयभीत झाले आहेत. ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला ५२ टक्के आरक्षणाचा विषय होता. त्याला आम्ही पाठिंबा दिला, पण ते टिकले नाही. तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्राने आरक्षणाला संरक्षण दिले नाही. उणिवांमुळे फेटाळले गेले. आता गायकवाड समितीच्या माध्यमातून ओबीसीमधून आरक्षणाची मागणी होत आहे. तशी याचिकाही बाळासाहेब सराटे यांनी दाखल केली आहे. त्याला तीव्र विरोध आहे.

ते म्हणाले, आरक्षणातून सरकार समाजात भांडणे लावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. आरक्षण बचावासाठी न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. चंद्रपूर, वणी, जालन्यानंतर आता सांगलीतही मेळावा घेऊन ताकद दाखवू.

चौकट

जयंत पाटील यांनी रोखावे

ओबीसी नेते दिशाभूल करत असल्याचा आरोप काही मंत्र्यांनी केला आहे. त्यावर शेंडगे म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणासाठी लेखी पत्रच दिले आहे. त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील का रोखत नाहीत?

----------

Web Title: Meet on 27th February in Sangli on behalf of OBC Jan Morcha