हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, आता सांगलीत हट्ट कशासाठी?; विश्वजित कदम यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 04:47 PM2024-04-05T16:47:04+5:302024-04-05T16:48:24+5:30

दिल्लीत ठरेल, त्यानुसार काम करू

Mashal has been given in Hatkanangle, now why insist on Sangli; Vishwajit Kadam question | हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, आता सांगलीत हट्ट कशासाठी?; विश्वजित कदम यांचा सवाल 

हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, आता सांगलीत हट्ट कशासाठी?; विश्वजित कदम यांचा सवाल 

सांगली : उद्धवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात एक जागा हवी होती, त्यासाठी ते सांगली मागत होते. बुधवारी त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. आता तिथे ‘मशाल’ चिन्ह आले आहे, मग सांगलीचा हट्ट कशासाठी? असा सवाल काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी पुणे येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

कोल्हापूरच्या बदल्यात सांगली या विषयाला लॉजिक नाही. कोल्हापूरच्या जागेबाबत महाविकास आघाडीची राज्य पातळीवर चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराजांचे नाव चर्चेला आले. त्यांच्याबद्दल समाज मनात खूप आदरचे स्थान आहे. ते जो पक्ष निवडतील, त्याचा सन्मान ठेवावा, असे ठरले. त्यानुसार त्यांनी काँग्रेस निवडला. कोल्हापूर पुरोगामी जिल्हा आहे, म्हणून त्यांनी तसा विचार केला. ती जागा काँग्रेसला गेली. त्यावेळी कुठेही अदलाबदलाची चर्चा नव्हती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना त्याची कल्पना होती. पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला जागा हवी होती. आता तुम्ही हातकणंगलेला जागा घेतली आहे. मशाल चिन्हावर तुम्ही लढत आहात. सत्यजीत पाटील उमेदवार आहेत, मग आता पुन्हा सांगलीसाठी शिवसेनेचा हट्ट कशासाठी? करता असे डॉ. कदम यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाने सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ज्याची जिथे ताकद व नेटवर्क आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदस्य व कार्यकर्त्यांचे जाळे आहे, तेथे त्या पक्षाने लढावे, असे अपेक्षित आहे. त्याअर्थाने सांगली आमची हक्काची जागा आहे. सांगलीतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, जनतेसाठी मी कठोर भूमिका घेतली आहे. ज्या सांगलीत मी काम करतो, तेथे आग्रही राहणे माझी जबाबदारी आहे. आमचाच प्रश्न सुटत नसेल, तर काँग्रेसच्या बैठकीला का जायचे? शिवसेनेने त्यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांना अजून दिशा नाही. भाजप उमेदवार जाहीर झालेत, त्यांनी प्रचार सुरू केला. आमचा निर्णय लवकर झाला पाहिजे.’’

दिल्लीत ठरेल, त्यानुसार काम करू

सांगलीबाबत काय राजकारण काय शिजते आहे, माहिती नाही. मला त्यात पडायचे नाही. निवडणुकीला केवळ एक महिना राहिलाय. मला भाजपच्या ऑफरबाबत बातम्या पेरल्या जातात, त्यात मला पडायचे नाही. सांगलीबाबत मात्र शेवटपर्यंत आग्रह राहील. त्यानंतर जे आमचे राज्यातील व दिल्लीतील नेते ठरवतील, महाविकास आघाडीचे जे ठरेल, त्यानुसार काम करू.’’

Web Title: Mashal has been given in Hatkanangle, now why insist on Sangli; Vishwajit Kadam question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.