Sangli Crime: महिलेच्या खुनाचा प्रयत्न, आरोपीस १० वर्षांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:20 IST2025-05-29T15:20:28+5:302025-05-29T15:20:47+5:30
माझ्या आई-वडिलांकडे पैसे मागितल्याची तक्रार का केलीस, असे म्हणत तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला होता

Sangli Crime: महिलेच्या खुनाचा प्रयत्न, आरोपीस १० वर्षांचा कारावास
इस्लामपूर : आष्टा (ता.वाळवा) येथे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर कोयत्याने हल्ला चढवत तिच्या खुनाचा प्रयत्न करत सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणीच्या आरोपीस दोषी ठरवून न्यायालयाने १० वर्षांचा कारावास आणि २५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
रोहित आनंदराव पवार (वय ३५, रा. आष्टा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील पहिले जिल्हा न्यायाधीश अनिरूद्ध गांधी यांनी आरोपीस विविध कलमांखाली दोषी धरून शिक्षा दिली. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी फिर्यादीतर्फे काम पाहिले.
फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी धानव्वा रेवाप्पा हिरेमठ (वय ४३) ही महिला जनावरांना चारा आणण्यासाठी आप्पा नायकवडी यांच्या शेतामध्ये गेली होती. धानव्वा या उसाचा पाला काढत असताना पाठीमागून कोयता घेऊन आलेल्या रोहित पवार याने माझ्या आई-वडिलांकडे पैसे मागितल्याची तक्रार का केलीस, असे म्हणत तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला.
याचवेळी तिच्या अंगावरील ४५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून पलायन केले होते. याप्रकरणी आष्टा पोलिसात रोहित पवार याच्याविरूद्ध खुनाच्या प्रयत्नासह जबरी चोरी आणि भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद झाला होता.
या खटल्याची सुनावणी न्यायाधीश गांधी यांच्यासमोर झाली. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे ॲड. पाटील यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यातील तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दीपक सदामते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्यासह फिर्यादी आणि पंचाच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा सुनावली. खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हवालदार उत्तम शिंदे, चंद्रशेखर बकरे यांनी सरकार पक्षाला मदत केली.