Sangli Crime: मुलाला ठार मारण्याचा मेसेज करून मागितली पाच लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:23 IST2025-12-09T19:23:26+5:302025-12-09T19:23:40+5:30
खंडणी मागण्याच्या नव्या ट्रेंडमुळे ईश्वरपुरात खळबळ

Sangli Crime: मुलाला ठार मारण्याचा मेसेज करून मागितली पाच लाखांची खंडणी
ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरात खंडणी मागण्याचा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी उकळण्यासाठी अपहरण ते खून झाल्याच्या घटना घडत असताना, ईश्वरपूर शहरात एका अज्ञात बहाद्दराने थेट मोबाइल फोनवर टेक्स्ट मेसेज करून ५ लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मुलाला जीवे ठार मारण्याची धमकीदेखील दिली. हा प्रकार २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या अवघ्या ११ दिवसांच्या कालावधीत घडला आहे.
याबाबत वडील विनायक गजानन साळी (वय ६६, रा. विनायकनगर, कोल्हापूर रोड, इस्लामपूर), जे निवृत्त कर्मचारी आहेत, यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाइल क्रमांक ९५७५८९१९२९ वरून संदेश पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०८(५), ३५१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अज्ञात संशयिताविरुद्ध ओळख लपवून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात संशयिताने त्याच्याकडे असलेल्या मोबाइलवरून विनायक साळींना त्यांच्या मोबाइल क्रमांक ९८६०८१६९१६ वर टेक्स्ट मेसेज पाठवला. मेसेजमध्ये ५ लाख रुपयांची खंडणी न दिल्यास त्यांचा मुलगा ओंकार विनायक साळी (वय ३४) याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. विनायक साळी हे महसूल खात्यातील अव्वल कारकून या पदावरून निवृत्त झाले आहेत, तर ओंकार परजिल्ह्यात खासगी नोकरी करतो.
खंडणी मागणाऱ्या अज्ञात संशयिताने थेट मोबाइलवर मेसेज करण्याचे धाडस केल्याने आणि त्यातच मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.