Sangli Crime: बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देणाऱ्यास अटक, संशयित आरोपींची संख्या सहावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:55 IST2025-10-16T11:54:09+5:302025-10-16T11:55:37+5:30
रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता

Sangli Crime: बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देणाऱ्यास अटक, संशयित आरोपींची संख्या सहावर
मिरज : एक कोटी रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणात कोल्हापुरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करण्यात आल्याने संशयित आरोपींची संख्या सहा झाली आहे. पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी इब्रार टोळीला प्रशिक्षण देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजित राजेंद्र पोवार (४४, रा. स्टेशनसमोर गांधीनगर, ता. करवीर) याला अटक केली आहे. न्यायालयाने पोवार यास दि. १७ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
या प्रकरणाचा सूत्रधार कोल्हापुरातील पोलिस हवालदार इब्रार इनामदार याने कोल्हापुरात सिद्धलक्ष्मी चहा कंपनीच्या नावाखाली बनावट नोटांचा छपाई सुरू केली होती. मिरजेत नोटा कमिशनवर देण्यासाठी आलेला सुप्रीत देसाई पोलिसांच्या सापडल्याने या रॅकेटचा भांडाफोड झाला.
याप्रकरणी इब्रार इनामदार, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे, सुप्रीत देसाई, सिद्धेश म्हात्रे या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. आता अटक झालेला अभिजित पोवार याने इब्रार व राहुल जाधव यांना बनावट नोटा तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे व बनावट रबरी शिक्के बनवून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. अभिजित पोवार याच्यावर कळे पोलिस ठाणे व गांधीनगर पोलिस ठाणे (कोल्हापूर) येथेही बनावट नोटानिर्मितीबद्दल गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.
रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता
राज्यभर या टोळीने बनावट नोटा वितरित केल्या का? या दिशेनेही पोलिसांकडून तपास सुरू असून, या रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.