ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 19:27 IST2025-12-03T19:26:57+5:302025-12-03T19:27:29+5:30
Local Body Election: आमदार जयंत पाटील यांची घटनास्थळी भेट

ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ
सुरेंद्र शिराळकर
आष्टा : आष्टा नगरपरिषद निवडणुकीत सुमारे दोन हजार मतदान वाढल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा व दहा या ठिकाणी झालेल्या मतदानाची आकडेवारी वाढल्याचा आक्षेप घेत आष्टा शहर विकास आघाडीसह शिवसेना शिंदे गट काँग्रेस व अपक्षांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान आमदार जयंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमची पाहणी केली व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
आष्टा नगर परिषदेसाठी काल, मंगळवारी (दि.२) चुरशीने ७४.७६ टक्के मतदान झाले. थेट नगराध्यक्षपदासह १२ प्रभागातील २४ जागांसाठी एकूण ३० हजार ५७४ मतदारांपैकी २२ हजार ८६४ मतदारांनी मतदान केले. मात्र प्रशासनातील एका व्यक्तीने प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा व दहा या ठिकाणी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत वाढ दाखवली. एकूण ३३ हजार ३२८ मतदार दाखवून २४ हजार ९१३ मतदान झाल्याचे सांगितले.
मतदार अन् मतदान किती दाखवले..
प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रत्यक्षात १३११ मतदारांपैकी ९९६ मतदारांनी मतदान केले. मात्र याठिकाणी ४०७७ मतदार दाखवून ३१०९ मतदान दाखवण्यात आले. प्रभाग क्रमांक चारमध्ये ३२१७ मतदारांपैकी २३७६ मतदान झाले. मात्र या ठिकाणी २४१३ मतदार दाखवून १८१२ दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाचमध्ये ३ हजार १५६ मतदारांपैकी २४५९ मतदारांनी मतदान केले. मात्र या ठिकाणी २३६६ मतदार दाखवून १८६२ मतदान झाल्याचे दाखवले. प्रभाग क्रमांक सहामध्ये ३०५६ मतदार असून २३९४ मतदारांनी मतदान केले. याठिकाणी २२९२ मतदारांपैकी १७९५ मतदान दाखवले. तसेच प्रभाग क्रमांक १०मध्ये १९७३ मतदारांपैकी १५५९ मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी ४३१९ मतदारांपैकी ३२६० मतदारांनी मतदान केल्याचे दाखवले.
तीन, पाच प्रभागातील केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड
मतदानावेळी प्रभाग क्रमांक तीनमधील सिद्धार्थनगर येथील मतदान केंद्रावर तसेच प्रभाग क्रमांक ५ मधील मतदान केंद्रावर सुमारे तासभर मतदान यंत्रातील बिघाडामुळे मतदान थांबवले होते. नवीन मतदान यंत्रे मिळाल्यानंतर याठिकाणचे मतदान सुरळीत सुरु झाले होते.