प्रेमाची फूस, मोबाइलचा लागला मोह; सांगली जिल्ह्यात वर्षभरात १३२ लेकी घरातून दुरावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:37 IST2026-03-12T19:37:31+5:302026-03-12T19:37:54+5:30
अल्पवयीन युवती पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ, वास्तवाचे भान आल्यानंतर ८० टक्के घरी परत

संग्रहित छाया
सांगली : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि कौटुंबिक विसंवादामुळे तरुण पिढी भरकटत असल्याचे धक्कादायक वास्तव सांगली जिल्ह्यात समोर आले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून १८ वर्षे पूर्ण झालेल्या १३२ युवतींने घर सोडल्याची नोंद झाली आहे. तसेच, अल्पवयीन मुलींचे प्रमाण देखील जवळपास तितकेच आहे.
मुख्यतः सोशल मीडियावरून होणारी ओळख आणि 'प्रेमाची फूस' यामुळे अल्पवयीन मुली घरून पळून जाण्याचे धाडस करत आहेत. पोलिस दलाकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार, १८ वर्षांवरील १३२ युवती बेपत्ता झाल्या आहेत. प्रेमप्रकरणातून घर सोडण्याचे प्रमाण जास्त असून, अनेकदा वास्तवाचे भान आल्यानंतर पश्चात्ताप होऊन यातील काही मुली घरी परततात.
मोबाईलचा अतिवापर आणि पालकांशी असलेला संवादाचा अभाव यामुळे मुलांच्या निर्णयक्षमतेवर डिजिटल दुनियेचा नकारात्मक पगडा बसत आहे. मुलांवर सक्ती करण्यापेक्षा पालकांनी त्यांच्याशी मैत्रीचे नाते जपल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
वर्षांत १३२ युवती बेपत्ता
सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १८ वर्ष पूर्ण झालेल्या एकूण १३२ युवतींनी घर सोडल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलींचे प्रमाणही जास्त आहे.
मोबाइलचा अतिरेक, सोशल मीडिया मुख्य कारण
तासनतास मोबाईलचा वापर आणि अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर होणारी मैत्री यामुळे मुली भरकटत असल्याचे दिसून येते.
प्रेमप्रसंगातून २५ टक्के मुले-मुली सोडतात घर
एकूण बेपत्ता प्रकरणांपैकी २५ टक्क्यांहून अधिक प्रकरणे ही केवळ प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याची आहेत.
वास्तवाचे भान आल्यानंतर ८० टक्के घरी परत
पळून गेल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक वास्तवाची जाणीव होताच सुमारे ८० टक्के मुले-मुली पुन्हा घरी परत येतात.
मुलांच्या निर्णयक्षमतेवर डिजिटल दुनियाचा पगडा
आभासी जगातील आकर्षणा मुळे मुलांची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होऊन ते चुकीचे धाडसी निर्णय घेत आहेत.
पालकांनी काय काळजी घ्यावी ?
- मुलांच्या मोबाइल वापराकडे लक्ष द्यावे आणि त्यांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांचे वेळीच निरीक्षण करून त्यांना विश्वासात घ्यावे.
- पालकांनो, सक्ती नव्हे मैत्रीने निघेल मार्ग
- पाल्यांशी कडक वागण्यापेक्षा किंवा सक्ती करण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधल्यास ते आपल्या समस्या मोकळेपणाने मांडू शकतील.