कृष्णेचा फुगवटा वाढला, हिप्परगी बॅरेजचे दरवाजे उघडा; जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाचे कर्नाटकला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:59 IST2025-07-28T15:58:02+5:302025-07-28T15:59:50+5:30

बॅरेजमुळे कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

Letter from Sangli Circle of Water Resources Department to Karnataka to open gates of Hippargi Barrage due to rising water level of Krishna River | कृष्णेचा फुगवटा वाढला, हिप्परगी बॅरेजचे दरवाजे उघडा; जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाचे कर्नाटकला पत्र

कृष्णेचा फुगवटा वाढला, हिप्परगी बॅरेजचे दरवाजे उघडा; जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाचे कर्नाटकला पत्र

सांगली : सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत गेल्या आठवडाभरापासून धो-धो पाऊस कोसळत असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढत आहे. ती नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. जलसंपदा विभागाच्या सांगली परिमंडळाने कर्नाटक जल प्राधिकरणाला पत्र दिले असून, हिप्परगी बॅरेजचे सर्व म्हणजे २२ दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे.

सांगलीच्या उपअधीक्षक अभियंत्यांनी कर्नाटक जल प्राधिकरणाच्या अथणी कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांना मेलद्वारे कृष्णा नदीच्या वाढत्या पाणीपातळीची माहिती दिली आहे. पत्रात म्हटले आहे की, कृष्णा नदीची वाढती पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा प्रवाह पुढे गतिमान होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व दरवाजे पूर्ण क्षमतेने खुले करावेत. सांगली, सातारा जिल्ह्यांतील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नद्यांत पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. साहजिकच कृष्णेची पाणीपातळी वाढू शकते. ती नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी पुढे जाणे आवश्यक आहे.

रविवारी सकाळी राजापूर बंधाऱ्यामध्ये कृष्णेची पाणीपातळी २९ फूट ४ इंच होती. सांगलीत आयर्विन पुजावळ १८ फूट होती. आयर्विन पुलापासून २६ हजार २४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, राजापूर बंधाऱ्यातून ६९ हजार ३३३ क्युसेक गतीने पाणी कर्नाटकात जात आहे. सांगली परिमंडळाने पत्रात म्हटले आहे की, पाण्याचे वाढते प्रमाण पाहता हिप्परगी बॅरेजमध्ये साठा करुन ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच बॅरेजचे सर्व दरवाजे उघडून पाणी पुढे सोडावे.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मुख्य सचिवांची १६ व २९ मे रोजी बैठक झाली होती, त्यातील निर्णयानुसार पावसाळ्यात कृष्णा नदी पूर्ण क्षमतेने, कोणत्याही अडथळ्याशिवाय मुक्तपणे वाहती ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळेच हिप्परगी बॅरेजमध्ये पाणीसाठा करू नये. सर्व दरवाजे उघडावेत.

अलमट्टी नव्हे, हिप्परगीमुळे फुगवटा

दरम्यान, कृष्णा नदीच्या फुगवट्याला व सांगलीतील महापुराला अलमट्टी धरण कारणीभूत नसून, हिप्परगी बॅरेजमधील पाणीसाठाच कारणीभूत असल्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे या पत्रावरून स्पष्ट होते. हिप्परगी बॅरेजमध्ये पाणी अडवून ठेवल्याने मागे कृष्णा नदीची पाणीपातळी फुगत जाते, पाण्याचा प्रवाह मंदावते आणि सांगलीला महापुराचा तडाखा बसतो, असा निष्कर्ष या पत्रातून निघाल्याशिवाय राहत नाही. रविवारी सकाळपर्यंत अलमट्टी धरणात ९७.५५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याविषयी परिमंडळाने या पत्रातून कोणताही आक्षेप घेतलेला नाही.

Web Title: Letter from Sangli Circle of Water Resources Department to Karnataka to open gates of Hippargi Barrage due to rising water level of Krishna River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.