सांगलीत सहा तालुक्यांत काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा दुष्काळ; विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी दिली होती कबुली, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:32 IST2026-01-24T18:32:08+5:302026-01-24T18:32:36+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी शिराळा–आटपाडीत उमेदवारीच नाही

Leadership drought in Congress in six talukas of Sangli Vishwajit Kadam, Vishal Patil had admitted it but.. | सांगलीत सहा तालुक्यांत काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा दुष्काळ; विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी दिली होती कबुली, मात्र..

सांगलीत सहा तालुक्यांत काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा दुष्काळ; विश्वजीत कदम, विशाल पाटील यांनी दिली होती कबुली, मात्र..

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसने आपला फोकस अवघ्या चार तालुक्यांपुरताच मर्यादित ठेवल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पलूस, कडेगाव, जत आणि मिरज या तालुक्यांत काँग्रेसची संघटनात्मक स्थिती तुलनेने भक्कम असून स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून पक्षाने निवडणुकीची व्यूहरचना सुरू केली आहे. मात्र, शिराळा, वाळवा, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ या सहा तालुक्यांत काँग्रेसची अवस्था बिकट असून अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवारच उपलब्ध नाहीत.

जिल्हा परिषदेचे ६१ गट असून त्यापैकी केवळ २५ जागा काँग्रेस लढवत आहे. यामध्येही त्यांनी चार तालुक्यांवरच फोकस ठेवला आहे. दहा पंचायत समित्यांमध्ये १२२ जागा असून त्यापैकी ४९ जागांवर काँग्रेसने उमेदवार उभा केले आहेत. पलूस व कडेगाव तालुक्यांमध्ये आमदार डॉ. विश्वजित कदम यांची मजबूत पकड आहे. या दोन्ही पंचायत समित्या ताब्यात घेण्यासाठी डॉ. कदम यांनी राजकीय फिल्डिंग लावली आहे. जत तालुक्यात माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासोबत आघाडी करून काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. 

मिरज तालुक्यात खासदार विशाल पाटील यांचा प्रभाव असून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची त्यांना साथ मिळत आहे. २५ जिल्हा परिषद गटांवर काँग्रेसने पूर्ण ताकद लावण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारही निश्चित केले आहेत. दुसरीकडे सहा तालुक्यांत काँग्रेसची संघटनात्मक कमजोरी असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. वाळवा तालुक्यातील ११ जिल्हा परिषद गटापैकी बोरगाव गट आणि दोन पंचायत समित्या काँग्रेस लढत आहे. काही मोजके चेहरे वगळता पक्षाची ताकद रोडावलेली आहे. आटपाडी, खानापूर आणि शिराळ्यात नेतृत्वाचा अभाव जाणवतो.

शिराळ्यात सत्यजित देशमुख यांनी पक्ष सोडल्यानंतर नवीन प्रभावी नेतृत्व उभे राहिलेले नाही. खानापूरमध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील बाहेर पडल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांतही दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
काही ठिकाणी ‘साटंलोटं’ राजकारणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाल्याची भावना असून, जिल्हा परिषद निवडणुकीतही तेच चित्र राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेससाठी निर्णायक

लोकसभा निवडणुकीनंतर सहा तालुक्यांतील काँग्रेसची अवस्था कमकुवत असल्याची कबुली आमदार विश्वजीत कदम व खासदार विशाल पाटील यांनी दिली होती. मात्र, दीड वर्षांचा कालावधी उलटूनही या तालुक्यांत नव्याने संघटन बांधणीसाठी ठोस पावले उचलली गेली का? याबाबत कार्यकर्ते सवाल उपस्थित करत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास मोठा खंड पडणार असल्याने ही निवडणूक काँग्रेससाठी निर्णायक ठरणार आहे.

विश्वजीत, विशाल यांचा कस लागणार

जिल्हा परिषदेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजप २३, काँग्रेस ९, राष्ट्रवादी १३, शिवसेना ३, रयत विकास आघाडी ४, स्वाभिमानी पक्ष १, विकास आघाडी (घोरपडे गट) २, अपक्ष ३, असे पक्षीय बलाबल होते. यामध्ये काँग्रेसकडे ९ सदस्य आणि एक पंचायत समिती ताब्यात होती. या कामगिरीमध्ये नऊ वर्षांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील पक्षाला उभारी देणार का? अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

Web Title : सांगली कांग्रेस को छह तालुकों में नेतृत्व का सूखा, चुनाव से पहले संकट।

Web Summary : सांगली कांग्रेस का ध्यान मजबूत संगठन के कारण चार तालुकों पर है। छह तालुकों में नेतृत्व की कमी है। आगामी जिला परिषद चुनाव कांग्रेस के पुनरुत्थान के लिए महत्वपूर्ण; नेताओं की परीक्षा।

Web Title : Sangli Congress faces leadership drought in six talukas before elections.

Web Summary : Sangli Congress focuses on four talukas due to stronger organization. Six talukas face leadership shortage. Upcoming Zilla Parishad elections are crucial for Congress's revival; leaders face test.