Sangli flood: पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा सोशल मीडियाच्या रिल्सवरच नेत्यांची स्पर्धा, जनतेला फक्त आश्वासनांचा महापूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:07 IST2025-08-22T19:07:08+5:302025-08-22T19:07:26+5:30

सध्या पक्ष जादा झाल्याने नेत्यांच्या सुळसुळाट

Leaders compete on social media reels rather than helping flood victims in Sangli | Sangli flood: पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा सोशल मीडियाच्या रिल्सवरच नेत्यांची स्पर्धा, जनतेला फक्त आश्वासनांचा महापूर

छाया-नंदकिशोर वाघमारे

अशोक पाटील

इस्लामपूर : पावसाळा सुरू झाला की, वारणा-कृष्णा खोऱ्यातील शेतकरी जनतेला महापूरसारख्या संकटाला सामोरे जावे लागते. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील बरेच नेते पूरग्रस्त भागात भेटी देऊन फोटो सेशन करून जनसेवा करण्याचे प्रदर्शन करतात. सध्या पक्ष जादा झाले आहेत. नेत्यांच्या सुळसुळाट आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना प्रत्यक्ष मदत करण्याऐवजी मीडियावर रिल्स करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामध्ये श्रेय लाटण्याचीही राजकीय खेळी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

वारणा-कृष्णा खोऱ्यात आमदार जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करत ग्राउंड रिपोर्ट घेतला. त्यांचेच विरोधक आमदार सत्यजित देशमुख आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी ही आपल्या समर्थकांना घेऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या तीन नेत्यांचे रिल्स समाजमाध्यमातून फिरत आहेत.

आपण का मागे म्हणूनच भाजपचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनीही पूरग्रस्त भागात जाऊन पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. महाडिक बंधूंचीही स्वतंत्र रिल्स समाजमाध्यमातून फिरत आहेत. इस्लामपूर मतदारसंघात नेहमीच स्वत:चे अस्तित्व दाखविणारा हुतात्मा पॅटर्न सध्या शिंदेसेनेत आहेत. त्याचे नेते गौरव नायकवडी यांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सध्या नायकवडी पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करताना दिसतात. एकंदरीत पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा मीडियावरील रिल्स करण्यात नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

स्व:ताचे मार्केटिंग करून जनसामान्यांत आपली प्रतिमा उंचाविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. पूरग्रस्त भागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात नेते अपयशी आहेत. त्यामुळे प्रत्येकवर्षी येणाऱ्या कृष्णाकाठावरील जनतेला महापुराला सामोरे जावे लागते. याच्यावर सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा. तेव्हाच नेत्याची दुकानदारी बंद होईल. - बी. जी. पाटील, बळीराजा शेतकरी संघटना
 

अलीकडील काळात पूरस्थिती म्हणजे नेत्यांना पर्यट स्थळ झाले आहे. कधी पूर येतो आणि ठराविक बगलबच्चे घेऊन फोटो सेशन करणे हाच उद्योग राजकीय नेत्यांचा झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कृष्णाकाठावरील नागरिकांना पुरासारख्या संकटाला तोंड द्यावे लागते. याच्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यापेक्षा नुसती सहानभूती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राजकीय नेते करीत आहेत. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Leaders compete on social media reels rather than helping flood victims in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.