Sangli: म्हैसाळ येथे कर्नाटक बस-ट्रक्टरचा अपघात, एसटी बस खड्ड्यात कोसळून २५ प्रवाशी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:00 IST2025-02-19T11:59:24+5:302025-02-19T12:00:15+5:30
म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बुधवारी के मार्टजवळ कर्नाटकची बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात उलटून बसचा ...

Sangli: म्हैसाळ येथे कर्नाटक बस-ट्रक्टरचा अपघात, एसटी बस खड्ड्यात कोसळून २५ प्रवाशी जखमी
म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बुधवारी के मार्टजवळ कर्नाटकची बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्येकर्नाटक बस खड्ड्यात उलटून बसचा चालक अशोक हुन्नुर (वय ४५, रा. अथणी) यांच्यासह २५ प्रवाशी जखमी झाले. जखमीवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला.
अधिक माहिती अशी, कर्नाटक महामंडळाची (केए २३ एफ १००५) ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती. यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा रिकामा ट्रॅक्टर (एमएच १० डीएन ९५५७) दोन ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता. कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली. त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली. या बसमधून ४० प्रवाशी प्रवास करीत होते. अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
बसचा चालक मात्र बराच वेळ बसमध्ये अडकला होता. बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे. शर्थीचे प्रयत्न करून बसचालकांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमीवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजित सिद, रणजित तीपे, म्हैसाळचे बीट अंमलदार बळीराम पवार, यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
वाहतुकीची कोंडी
बुधवारी सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाल्याचे कळताच म्हैसाळ येथील तरुण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी म्हैसाळ-कागवाड राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर वाहतूक शाखेचे पोलिस दाखल होताच वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.
म्हैसाळ येथील अपघातातील २५ जखमी प्रवाशी उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी पाच प्रवाशांनी डिस्चार्ज घेतला आहे. २० प्रवाशांना २४ तास रुग्णालयात ठेवणार आहोत. चालकाचा पाय मोडला असून सर्व प्रवाशांची प्रकृती ठिक आहे. -रूपेश शिंदे, उपअधीष्ठता, मिरज शासकीय रुग्णालय.