जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:14 IST2024-12-20T18:14:00+5:302024-12-20T18:14:46+5:30

जानेवारीत निर्णयाची शक्यता

Jayant Patil stance unsettles leaders from all parties, scares opposition | जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले 

जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले 

अशोक पाटील

इस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेवर इस्लामपूर मतदारसंघातील सर्वच पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आहेत. पाटील यांच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी सध्यातरी आपले देव पाण्यात घातलेले आहेत. शहरातील एका कार्यक्रमात सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. पाटील यांनी महायुतीत प्रवेश केल्यास आपले भवितव्य काय ? असा अस्वस्थ करणारा प्रश्न भाजप, राष्ट्रवादी व शिंदेसेनेतील स्थानिक नेत्यांना पडला आहे. परंतु, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याच्या पाटील यांच्या संदिग्ध भूमिकेने समर्थक मात्र मौन बाळगून आहेत.

सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. यावर राजकीय वर्तुळात विविध पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषत: सांगली जिल्ह्याचे मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठीच राखून ठेवल्याचे मतदारसंघातून चर्चेले जात आहे. परंतु, भाजप किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) यापैकी एका पक्षात जयंत पाटील प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त होतोय. मात्र, पाटील यांच्या मौनाच्या भूमिकेमुळे इस्लामपूर मतदारसंघातील त्यांचे विरोधक अस्वस्थ झाले आहेत.

जयंत पाटील समर्थकांचे मौन..

माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या घरगुती कार्यक्रमात सर्वच पक्षातील नेते एकत्र आले होते. यामध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकांनी मौन पाळले, तरी आमच्यापेक्षा विरोधी पक्षातील नेत्यांना पाटील यांच्या संदिग्ध भूमिकेची काळजी लागून राहिली आहे. पाटील हे महायुतीत सामील झाल्यास आमच्या राजकीय भवितव्याचे काय होणार, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.

जानेवारीत निर्णयाची शक्यता

सध्या नागपूर येथे अधिवेशन सुरू आहे. आ. जयंत पाटीलही अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या चर्चा असल्या तरी जानेवारी महिन्यात आ. पाटील योग्य निर्णय घेतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.


भाजप हा देश पातळीवरील पक्ष आहे. १९९५ पासून आम्ही भाजपमध्ये कार्यरत आहे. भाजप सर्वसमावेशक पक्ष असल्याने हिंदुत्व मानावयास जे तयार आहेत, असे सर्वच लोक भारतीय जनता पार्टीत येतात. त्यामुळे भाजपमध्ये कोणीही प्रवेश केला तरी कार्यकर्ते अस्वस्थ होत नाहीत. - सी. बी. पाटील, माजी राष्ट्र कार्यकारिणी सदस्य
 

आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मतदारसंघात राहण्याचे काम करू. जयंत पाटील यांच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होईल, त्याचे पालन करू. - केदार पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

Web Title: Jayant Patil stance unsettles leaders from all parties, scares opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.