Sangli Politics: गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर इस्लामपूरचे राजकारण पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:37 IST2025-09-20T14:36:20+5:302025-09-20T14:37:05+5:30
सर्वपक्षीय नाराजीचा सूर

Sangli Politics: गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर इस्लामपूरचे राजकारण पेटले
अशोक पाटील
इस्लामपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर संपूर्ण वाळवा तालुका आणि इस्लामपूर परिसरातील राजकारण पेटले आहे. सर्वपक्षीय नाराजीचा सूर उमटत असतानाच भाजपमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही पडळकरांच्या वक्तव्याबद्दल पक्षातील वरिष्ठांकडे तक्रारीचा सूर आळवला आहे.
वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या नावाचा पडळकर यांनी गुरुवारी जतमध्ये एकेरी शब्दांत उल्लेख करीत जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पडळकर यांच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा वक्तव्याबाबत नाराजी दर्शविली. पडळकर यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेश नेतेसुद्धा संभ्रमात आहेत.
वाचा- तुझी चड्डीसुद्धा ठेवणार नाही; बापू बिरूंच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना थेट इशारा
इस्लामपूर मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे सध्या भाजपमध्ये आहेत. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना एकेकाळी ओळखले जात होते. ते सध्या भाजपमध्ये असून राज्यात धनगर समाजाचे नेतृत्व करीत आहेत. भाजपला चिमण डांगे यांच्यासारखे नेतृत्व इस्लामपूर मतदारसंघास मिळाले आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या समर्थकांतही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
सर्वच नेत्यांनी एकमेकांचा आदर करावा. राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करणारे व्यक्तिमत्त्व समाजाचे आदर्श असतात. अलीकडील राजकारणात ‘अरे’ ला ‘का रे’ म्हणणारे नेते निर्माण झाले आहेत. याची कारणे राजकारण्यांनी शोधावीत. महाराष्ट्राचे राजकारण विकासात्मक होते. राजकारणातील प्रस्थापित विस्थापितांचा आवाज दाबण्याचे काम करतात. त्यामुळेच राजकीय वातावरणात अशी परिस्थिती उद्भवत आहे. सर्वच नेत्यांनी आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा. - सदाभाऊ खोत, आमदार, भाजप पुरस्कृत