साखराळेतील माजी सैनिकांवरील अन्यायाला विधिमंडळात वाचा फोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:21+5:302021-02-05T07:28:21+5:30

इस्लामपूर : वाळवे तालुक्यासारख्या क्रांतिकारकांच्या भूमीत देशासाठी लढणाऱ्या माजी सैनिकांचा अवमान केला जात आहे. काही राजकीय लोकांच्या दबावामुळे साखराळे ...

Injustice against ex-servicemen in Sakharale will be exposed in the legislature | साखराळेतील माजी सैनिकांवरील अन्यायाला विधिमंडळात वाचा फोडणार

साखराळेतील माजी सैनिकांवरील अन्यायाला विधिमंडळात वाचा फोडणार

इस्लामपूर : वाळवे तालुक्यासारख्या क्रांतिकारकांच्या भूमीत देशासाठी लढणाऱ्या माजी सैनिकांचा अवमान केला जात आहे. काही राजकीय लोकांच्या दबावामुळे साखराळे (ता. वाळवा) गावठाणातील माजी सैनिकांना दिली जाणारी जागा काढून घेण्यात आली. तालुक्यातील प्रशासन दहशतवाद माजवून काम करीत आहे. माजी सैनिकांच्या या प्रश्नावर जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी विधिमंडळात आवाज उठविणार असल्याची माहिती आ. सदाभाऊ खोत यांनी दिली.

खोत म्हणाले, साखराळे येथील माजी सैनिकांचे गेल्या सात दिवसांपासून प्रशासकीय इमारतीसमोर सहकुुटुंब उपोषण सुरू आहे. महसूल प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. येथील महसूल अधिकाऱ्यांकडून सामान्य जनतेला दिलासा मिळत नाही. सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. राजकारणाचा बुरखा पांघरून तयार झालेले गुंड शासकीय कार्यालयात वावरत आहेत.

ते म्हणाले, मी सुद्धा मंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसांच्या प्रश्नांना महत्त्व दिले. सध्या अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जायला रस्ते मिळत नाहीत. अनेकांची अडवणूक होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाचा कारभार गतिमान होणे गरजेचे आहे. पक्षभेद बाजूला ठेवून जनतेची कामे करण्याची परंपरा या तालुक्याची आहे. ती पुढे सुरू राहिली पाहिजे.

खोत म्हणाले, या देशात पंतप्रधानांपासून मुख्ममंत्र्यांपर्यंत सर्वजण जवानांचा सन्मान करतात. तर जनता त्यांना सलाम करते. मात्र, क्रांतिकारकांच्या तालुक्यामध्ये माजी सैनिकांना हे सरकार निवारा देऊ शकत नाही. हा सर्व प्रकार चीड आणणारा आहे. विधिमंडळात माजी सैनिकांवरील अन्यायाला वाचा फोडणार आहोत. गुरुवारी निघणाऱ्या माजी सैनिकांच्या मोर्चात रयत क्रांती संघटना सहभागी होऊन आक्रमक भूमिका घेणार आहे. यावेळी लालासाहेब पाटील, विनायक जाधव, बजरंग भाेसले उपस्थित होते.

चौकट

शहरात लक्ष घालणार

आ. सदाभाऊ खोत म्हणाले, शहरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी आपल्याकडे येत आहेत. उपनगरांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शहरामध्ये लक्ष घालणार आहे.

Web Title: Injustice against ex-servicemen in Sakharale will be exposed in the legislature