आयकर विभागाची सांगली, पुणे, बारामतीत छापेमारी, मंत्री परबांच्या जवळील अधिकाऱ्याकडे बेहिशेबी संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:26 IST2022-03-18T13:22:40+5:302022-03-18T13:26:05+5:30
मंत्री अनिल परब यांच्या जवळचा मानला जाणाऱ्या अधिकाऱ्याकडील बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीसाठी ही कारवाई झाली. त्यात मोठे घबाड सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले.

आयकर विभागाची सांगली, पुणे, बारामतीत छापेमारी, मंत्री परबांच्या जवळील अधिकाऱ्याकडे बेहिशेबी संपत्ती
सांगली : आयकर विभागाने ८ मार्च रोजी जिल्ह्यात केलेल्या छापेमारीत प्रचंड प्रमाणात बेहिशेबी संपत्ती सापडली आहे. आयकर विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे छापेमारीचे तपशील स्पष्ट केले आहेत.
सांगली, तासगाव, बेडग, पुणे आणि बारामतीत एकाचवेळी तब्बल २६ ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती. आरटीओ विभागात असलेल्या या अधिकाऱ्याची मुंबईत केबल व्यवसायात भागीदारी आहे. सांगलीत विश्रामबागला गणपती मंदिराजवळील कार्यालय आणि शंभर फुटी रस्त्यावरील बंगल्यात, तसेच वंजारवाडी (ता. तासगाव) येथील आलिशान फार्म हाऊसमध्ये आयकरने शोधमोहिम राबविली. मंत्री अनिल परब यांच्या जवळचा मानला जाणाऱ्या अधिकाऱ्याकडील बेहिशेबी संपत्तीच्या चौकशीसाठी ही कारवाई झाली. त्यात मोठे घबाड सापडल्याचे आयकर विभागाने सांगितले.
या अधिकाऱ्याने गेल्या दहा वर्षांत पुणे, सांगली, बारामती आदी ठिकाणी मालमत्ता खरेदी केली आहे. त्याच्या नावावर पुणे परिसरात एक बंगला आणि फार्म हाऊस, तळेगाव भागात एक फार्महाऊस, सांगलीत दोन बंगले, दोन हिऱ्यांची दुकाने, पुण्यात पाच सदनिका, नवी मुंबईत एक सदनिका आहे. सांगली, बारामती व पुणे भागात मिळून १०० एकरपेक्षा जास्त जमीन आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादने, हिऱ्याच्या दागिन्यांचा व्यवसाय, बांधकाम, रिअल इस्टेट आणि पाईप उत्पादन व्यवसायात गुंतवणूक केली आहे. बांधकाम व्यवसाय त्याच्या परिवारातील सदस्य चालवितात. अधिकाऱ्यांशी संबंधातून त्यांने अनेक सरकारी ठेके मिळविल्याचे आयकर विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले.
बांधकाम व्यवसायातील कर चुकवेगिरीचा तपास आता सुरु करण्यात आला आहे. बारामतीमधील एका जमिनीच्या व्यवहारात दोन कोटींची मिळकत झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. छापेमारीत रोख ६६ लाख रुपये जप्त करण्यात आले. आयकर आयुक्त सुरभी अहलुवालीया यांनी ही माहिती दिली.
बनावट कागदपत्रांद्वारे २७ कोटींची कंत्राटे
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याने बनावट दस्ताऐवज वापरुन तब्बल २७ कोटींची सरकारी कंत्राट मिळविल्याचेही छापेमारीत स्पष्ट झाले आहे. बारामतीमधील छापेमारीत दोन कोटींची बेहिशेबी रक्कम मिळाली. जमिनीच्या विक्रीतून ती मिळाल्याचे दिसून आले. छापेमारीत संगणकातील माहिती व महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. एका सामान्य आरटीओ अधिकाऱ्याची ही कमाई पाहून आयकर विभागही चक्रावून गेला आहे.