Sangli-Local Body Election: भाजप-शिंदेसेनेचे आष्टा, शिराळा, तासगावात सख्य; अन्यत्र संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 20:04 IST2025-11-20T20:01:47+5:302025-11-20T20:04:09+5:30
नगरपालिका निवडणुकांचे रंग : महायुतीमधील नेत्यांचे सूर जुळेनात

Sangli-Local Body Election: भाजप-शिंदेसेनेचे आष्टा, शिराळा, तासगावात सख्य; अन्यत्र संघर्ष
सांगली : राज्यात भाजप व शिंदेसेना या मित्रपक्षांमध्ये संघर्षाचे वारे वाहू लागले असताना जिल्ह्यातही दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. बहुतांश नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीतही हे दोन मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात काम करताना दिसताहेत. आष्टा, शिराळा, तासगाव वगळता अन्य चार नगरपरिषद व एका नगरपंचायतीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे सूर जुळलेले नाहीत. काही ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष सुरु झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती म्हणून एकत्र येण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची मोट बांधली गेली नाही. विशेषतः भाजप व शिंदेसेना यांच्यात फारसे सख्य नसल्याचे चित्र दिसत आहे.
ईश्वरपूरला एकत्र असले तरीही
ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात विकास आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर सर्व पक्ष एकत्र आले असले तरी याठिकाणी भाजप व शिंदेसेनेचे फारसे सख्य नाही. निवडणुकांच्या निमित्ताने ही त्यांच्यात केवळ औपचारिकता दिसत आहे. अन्य वेळी त्यांच्यात धुसफूस सुरु असते.
विट्यात स्वतंत्र लढाई
विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध भाजप अशीच लढत होत आहे. एकमेकांचे लोक फोडण्याचे काम याठिकाणीही झाले आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिल्याने या ठिकाणचा संघर्ष सर्वाधिक चर्चेला ठरला आहे.
आटपाडीत संघर्षाचे वारे
आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीतही हेच चित्र आहे. याठिकाणी शिंदेसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे भाजपमध्ये दोन गट आहेत. त्यामुळे महायुतीचे त्रांगडे दिसून येत आहे. शिंदेसेना व भाजपमध्ये याठिकाणी मित्रत्वाची भावना दिसून येत नाही.
जतमध्ये आमने-सामने येणार
जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत ही शिंदेसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. याठिकाणी महायुती मधील हे दोन्ही मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढण्यासाठी सरसावले आहेत. दोन्हीकडून उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणावर दाखल करण्यात आले आहेत.
पलूसमध्ये सूर जुळणे कठीण
पलूसमध्ये महायुतीत गाेंधळ दिसून येतो. याठिकाणी निवडणुकीव्यतिरिक्त कधीही भाजप व शिंदेसेनेचे सूर जुळलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी चौरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत.
शिराळा, आष्ट्यात गट्टी जमली
शिराळा नगरपंचायत व आष्टा नगरपरिषदेच्या निवडणुकीत या दोन्ही मित्रपक्षांची मैत्री फुलली आहे. निवडणुकांच्या माध्यमातून हे दोघे एकत्र आले असले तरी त्यांच्यातील तिसरा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने सवतासुभा मांडला आहे.
तासगावमध्ये नात्यातील औपचारिकता
तासगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत ताकदीच्या पातळीवर फार काही करु न शकलेल्या दोन मित्रपक्षांमध्ये एकत्रीकरणाची औपचारिकता पार पडली आहे.
बिघाडीचे प्रमाण अधिक
जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप व शिंदेसेनेच्या मैत्रीचे बंध जुळण्याचे प्रमाण ३७.५ टक्के तर संघर्षाचे प्रमाण ६२.५ टक्के दिसून येते.